कोणत्याही चित्रपटाची तिन्ही गाणी प्रदर्शित होताच इतकी जास्त प्रसिद्ध होतात आणि रसिकांच्या गळ्यातील ताइत बनतात हे फार कमीच पाहायला मिळते. पण निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाबाबत असेच काहीसे घडत आहे. या चित्रपटाच्या अगदी पहिल्या टिझरपासून ते त्याच्या ट्रेलरपर्यंत आणि प्रदर्शित झालेल्या प्रत्येक गाण्यापर्यंत सर्वत्र ‘ऐ दिल है मु्श्किल’चाच गाजावाजा आहे. करणच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटातील आणखी एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. करणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. ‘चन्ना मेरेया..’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

रणबीर आणि अनुष्कावर चित्रित झालेल्या या गाण्याला संगीतकार प्रितमने संगीतबद्ध केले असून अरिजित सिंगने ते गायले आहे. मैत्रीतून फुललेल्या एकतर्फी प्रेमाचे आणि प्रेमभंगाचे हृदयद्रावक वर्णन या गाण्यात ऐकावयास मिळते. अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या गाण्यात रणबीर आणि अनुष्काचे नाते आणि त्यांच्या नात्यामध्ये असणारे गांभीर्य पाहावयास मिळत आहे. या गाण्यात अनुष्का एका मुसलमान वधुच्या वेशात दिसत आहे, तर रणबीरसुद्धा पारंपारिक वेशात दिसतो. ‘अच्छा चलता हू दुवाओं मे याद रखना..’ अशा ओळींनी सुरुवात होणाऱ्या या गाण्याशी प्रत्येकाने स्वत:ला जोडले आहे. त्यामुळे रणबीरचे हे गाणे अवघ्या काही काळातच रसिकांनी उचलून धरल्याचे पाहावयास मिळतेय. याआधीही या चित्रपटाचे शीर्षकगीत आणि ‘बुल्लेया’ या गीतांनी रसिकांना भुरळ घातली होती. त्यामुळे रणबीरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ बाबत सध्या कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.