चित्रपटनिर्मितीचं गणित बॉलीवूडसाठी दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. निर्मितीच्या खर्चाचा आकडा आटोक्यात येत नाही आणि बॉक्सऑफिसवरून त्याचा धड परतावाही मिळत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या बॉलीवूडसाठी हे वर्ष आत्तापर्यंतचं सर्वात वाईट वर्ष म्हणून गणलं जात आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटांमध्ये डझनावारी चित्रपट फ्लॉप गेले आहेत. ‘बाहुबली २’ वगळता कोणत्याही चित्रपटाला फार मोठं यश मिळालेलं नाही. किंबहुना, ‘बाहुबली २’च्या बाबतीतही हिंदीपेक्षा तेलुगू आवृत्तीची कमाई जास्त असल्याने तिथेही श्रेय प्रादेशिक चित्रपटांकडेच जाते. ‘रंगून’ ते ‘जब हॅरी मेट सेजल’ अशी ब्लॉकबस्टर्स नाही तर फ्लॉपबस्टर्सची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

चित्रपट हिट की फ्लॉप हे काही आमच्या हातात नसतं, असं एके काळी म्हणणारे कलाकार आता मात्र आपापल्या नावावर, बाजारमूल्यावर मोठमोठे चित्रपट आपल्याकडे खेचून घेतात. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान यांच्या नावावर चित्रपट शंभर-दोनशे कोटींचा गल्ला जमवणारच या हमीनिशी कोटय़वधींचा खर्च करू न चित्रपट केले जातात. अनेकदा कलाकार स्वत: सहनिर्मात्याच्या भूमिकेत असल्याने चित्रपटाच्या यशापयशाची पूर्ण जबाबदारी त्यालाच घ्यावी लागते. मात्र यावर्षी ‘स्टार’ कलाकारांचेही स्टार तिकीटबारीवर फिके पडले आहेत. ज्यावेळी बिग बजेट चित्रपट चालले नाहीत आणि छोटेखानी चित्रपट चालले. तेव्हा असे छोटेखानी चित्रपट चांगले चालतात अशी समजूत क रून घेत त्या प्रकारच्याही चित्रपटांची एकच लाट आली. पण तेही सगळेच चित्रपट चांगली कमाई करताना दिसत नाहीत. या वर्षांच्या सुरुवातीलाच शाद अली दिग्दर्शित ‘ओके जानू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मणिरत्नम यांच्या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक, आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ही ‘आशिकी २’ची हिट जोडी, रेहमानचे संगीत अशी सगळी भट्टी असूनही चित्रपट चालला नाही. विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’कडूनही प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या. चित्रपटाचा आशय चांगला नव्हता असंही नाही. कंगना राणावत-शाहीद आणि सैफ अली खानसारखे तगडे कलाकार असूनही हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला. या सगळ्यामागे ट्रेड विश्लेषकांच्या मते तरी आशय चांगला नसणे किंवा तो प्रभावीपणे मांडता न येणे हे एकच कारण आहे. यावेळी राकेश ओमप्रकाश मेहरासारख्या दिग्दर्शकाचाही ‘मिर्झिया’सारखा वेगळा संगीतमय प्रयोग प्रेक्षकांना फारसा रुचला नाही. ना अनुराग बासूने केलेला ‘जग्गा जासूस’ त्यांच्या पचनी पडला आहे. यावर्षी चित्रपट हिट की फ्लॉप ठरवताना त्यामागे एकच एक सर्वसाधारणपणे असं झालं असेल असं काही कारण अजूनतरी निर्माता-दिग्दर्शकांना सापडलेलं नाही. आणि त्यामुळेच त्यांच्यातील गोंधळ अधिकच वाढला आहे.

फ्लॉपच्या या मांदियाळीमागे प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या पद्धतीत काही फार बदल झालेला आहे असं नाही. पण या प्रत्येक यशापयशामागे वेगवेगळी तत्कालिक कारणे आहेत, असं चित्रपट समीक्षक-अभ्यासक गणेश मतकरी यांनी सांगितलं. हॅरी पॉटरच्या चित्रपटांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यावेळी हॅरी पॉटरच्या कथा वाचणारी मुलं लहान होती. तेव्हा ते कादंबरी आणि चित्रपट एकत्र बघत मोठी झाली. आता जर त्यांना पुन्हा हॅरी त्याच भूमिकेत दाखवला तर ते पटणारच नाही. त्यामुळे आता जी नवी कथा जे. के. रोलिंगने लिहिली आहे त्यात हॅरी मोठा झालेला दाखवला आहे आणि त्याच्या त्या वयाला अनुसरूनच तिने ती कथा लिहिली आहे. आपल्याक डे चित्रपटांच्या बाबतीत एकपडदा चित्रपटगृहांची जागा मल्टिप्लेक्सनी जेव्हा घेतली हा मोठा बदल झाला. कारण तोवर सगळ्या प्रकारचे मनोरंजन देणारा सर्वसमावेशक असा चित्रपट ही एकच गोष्ट आपल्याला माहिती होती. मल्टिप्लेक्स आल्यानंतर छोटे चित्रपट करता येऊ लागले. जे केवळ शहरी प्रेक्षकांपुरते मर्यादित होते. त्यामुळे नेहमीचे व्यावसायिक बिग बजेट चित्रपट आणि छोटय़ा बजेटचे चित्रपट असे दोन प्रकार इथे निर्माण झाले. इथेही पुन्हा या छोटय़ा बजेटच्या चित्रपटांची तुलना आधीच्या समांतर चित्रपटांच्या प्रवाहाशी करता येईल. तुलनेने आत्ताचे छोटे चित्रपट हे त्यावेळच्या समांतर चित्रपटांपेक्षा अधिक मनोरंजक, वादग्रस्त असतील. पण या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांचा प्रेक्षक इथे तयार झाला, ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन आताचे निर्माते-दिग्दर्शक प्रयोग करतायेत, असं मतकरी यांनी सांगितलं. तरीही त्यांचे ठोकताळे चुकतायेत, हे दुर्लक्ष करता येणार नाही. अर्थात, यामागे पुन्हा एकदा कलाकारांचे स्टारडम आणि व्यावसायिक चौकटीतच राहून प्रयोग करण्याची दिग्दर्शकांची धडपड कारणीभूत असल्याचे मतकरी यांनी स्पष्ट केले.

ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांच्या मते मोठमोठय़ा कलाकारांच्या नावाखाली सर्वसाधारण आशय दिला जातो हेही या चित्रपटांच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे. तर बडय़ा कलाकारांच्या चित्रपटांच्या बजेटचा आकडा सतत वाढता असल्याने जेव्हा त्यांचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जमेच्या रकमेपेक्षा खर्चाचीच बाजू मोठी असणं हे साहजिकच असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट चांगला असूनही तो खूप चालला असं नाही. पण चित्रपटच मुळी ६ कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. चित्रपटाची कमाई १४ कोटींच्या घरात गेल्याने अर्थातच निर्माता-दिग्दर्शक दोघांनाही फायदा झाला. हेच गणित शाहरूख खानच्या ‘रईस’च्या बाबतीत उलटे लागू पडले. ‘रईस’ला शाहरूख खानचा चित्रपट असल्याने मोठय़ा प्रमाणात शोज मिळाले, सुरुवातही चांगली झाली. चित्रपटाने देशभरातून १३१.६५ कोटींची कमाई केली. पण चित्रपटाचे बजेटच ८५ कोटी होते त्यामुळे जमा-खर्चाचा मेळ बसवताना ही तफावत राहणारच होती. अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’च्या बाबतीत हेच अनियंत्रित बजेट भोवले असल्याचे मतकरी यांनी सांगितले. ‘जग्गा जासूस’ हा संगीतमय चित्रपटाचा प्रयोग होता. ‘रंगून’, ‘जग्गा जासूस’ हे अजूनही आपल्या प्रेक्षकांना परग्रहवासीयांसारखे वाटतात. ‘जग्गा जासूस’चा प्रेक्षक मर्यादित असणार हे लक्षात घेऊनच त्याच्या निर्मिती खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. ‘बाहुबली’च्या खर्चात ‘फँड्री’चा आशय दिला तर चालेल का? आशय आणि चित्रपट निर्मितीमूल्य यांची सांगड घालणे निर्माता-दिग्दर्शकांना जमायला हवे. जे रणबीर कपूर, शाहरूख खानसारखे मोठे कलाकार आल्यानंतर दिग्दर्शकांना जमत नाही. बालाजी किंवा चोप्रा यांच्या बॅनरकडून कित्येकदा बजेटवर नियंत्रण ठेवून चित्रपट केले जातात. मात्र मोठय़ा कलाकारांच्या चित्रपटांच्या बाबतीत अजूनही सढळ हातानेच काम केले जाते आणि त्याचा परिणाम मग फ्लॉपबस्टर्सच्या रूपात समोर येतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे. सध्या अक्षयकुमार आणि आमिर खानसारख्या कलाकारांनी काही प्रमाणात हे गणित जुळवून घेतलं आहे. मात्र येत्या काळात निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकार या बॉलीवूडच्या त्रिकूटाने विचारपूर्वक हे जमा-खर्चाचे गणित लक्षात घेऊन, गांभीर्याने आशयमांडणी केली नाही तर ब्लॉकबस्टर्सऐवजी फ्लॉप्सचीच यादी वाढत राहील, यात शंका नाही.

‘शाहरुखने धोका पत्करायला हवा’

शाहरूख खानने आपल्या नेहमीच्या प्रतिमेला मोडून काढणारे चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यात सातत्याने अपयशीच ठरतोय. याचं मोठं कारण म्हणजे त्याने परिस्थितीनुरूप स्वत:ला वेळीच बदलले नाही. तो अजूनही कुठेतरी तरुण प्रेक्षकांना धरून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. ‘चक दे’ करतानाही तो तरुण हॉकी संघाच्या टीमचा प्रशिक्षक होता. ‘स्वदेस’ असेल किंवा त्याचे इतर चित्रपट अजूनही तो त्याच्या स्टाइलप्रमाणे कुठे ना कुठे रोमॅंटिक भूमिकेत अडकून पडतो. आमिर खानने आपल्या भूमिकांमध्ये जो बदल करून घेतला तो शाहरूखला अजूनही जमलेला नाही. त्यामुळे त्याने प्रतिमा बदलायचा प्रयत्न केला असला तरी तो फार यशस्वी ठरत नसल्याचे मतकरी यांनी सांगितले. त्याने अधिकाधिक गंभीर, वेगळ्या भूमिका करण्याचा धोका पत्करायला हवा, असेही ते म्हणाले. एकीकडे शाहरूखला त्याच पद्धतीच्या हिरो रूपात पाहणारा प्रेक्षक आहे. तसंच इम्तियाजसारख्या दिग्दर्शकाने अजूनही ‘जब वुई मेट’च्या धाटणीचेच चित्रपट करावेत, अशी विचारधारा असलेला प्रेक्षकवर्गही मोठा असल्याने त्याचा परिणाम चित्रपटांच्या व्यवसायावर होतो.