dilip-thakurतू लग्न कधी करतेस?… माधुरी दीक्षितला सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न कोणता असेल तर हाच… जवळपास सर्वच भारतीय भाषांतील चित्रपट अभिनेत्रीना कधी तरी या प्रश्नावर उत्तर द्यावे लागतेच. प्रश्न अर्थातच सिनेपत्रकार करतात. का करतात, कारण तो अनेक वर्षांपासून केला जातोय. तरी सत्तरच्या दशकात कुचाळक्या करणार्‍या अर्थात गॉसिप्स पत्रकारितेला सूर सापडला तेव्हापासून तर एखादी आघाडीची अभिनेत्री या प्रश्नाच्या तावडीतून सुटली असेल. जुही चावलाने बराच काळ आपल्या लग्नाची घोषणा केली नाही. पण ती व जय मेहता अंधेरीतील मिल्लत नगरमधील एका इमारतीत सख्खे शेजारी म्हणून राहतात याची ब्रेकिंग न्यूज गॉसिप्सवाल्याना सापडली व त्यावरून कथा दंतकथाना जन्म मिळाला. येथे आपल्याच अभिनेत्रींच्या लग्नाची न संपावी अशी गोष्ट का सांगतोय तर हॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या लग्नाच्या रिमेक गोष्टी अथवा सिक्वेल फार. तो पूर्णपणे वेगळाच विषय आहे. एकाच पुरुषासोबत एखादी अभिनेत्री पुन्हा लग्न करते हे कोडेच सहजी न सुटणारे. त्याहीपेक्षा ते सहज न सुटलेलेही बरे. काय सांगावे त्यातून आणखीन काही प्रश्न निर्माण होतील. मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाची लाट आलीय म्हणून अभिनेत्रींच्या लग्न संस्कृतीवर हा ‘फोकस’. मृण्मयी देशपांडे, अतुला दुगल, श्रृती मराठे, कादंबरी कदम वगैरे मिळून सहा सात लग्ने झाली. सर्वानाच शुभेच्छा. खरं तर लग्न ही अत्यंत खासगी गोष्ट. त्याचा अभिनयाशी संबंध काय, एकदा का एखादी अभिनेत्री स्टुडिओत आली की ती आपल्या भूमिकेवर किती व कसे लक्ष देते हे जास्तच महत्त्वाचे. त्यात ती विवाहित आहे अथवा नाही हा प्रश्न उपस्थित होतोच कुठे असे मंथन वा चिंतन येथे कोणीच विचारात घेत नाहीत. ती एक स्त्री असून आपल्या लग्नाचा निर्णय घेण्यात ती सक्षम आहे हे स्वाभाविक आहे. पण तसे होत नाही. विशेषत: आघाडीच्या अभिनेत्रींच्या पहिल्या प्रेम प्रकरणापासूनच गॉसिप्सवाले व तिचे चाहनेवाले तिच्या ‘लग्नाची गोष्ट’ रंगवायला सुरुवात करतात. मग मुलाखतीत प्रश्न सुरु होतो, लग्न कधी करतेस? गंमत म्हणजे नायकाला अर्थात हिरोला हा प्रश्न फारसा कधी होत नाही. जणू तो वय व करियरचे गणित सांभाळून लग्न करणार याची खात्रीच असते.

अभिनेत्रींच्या लग्नातील काही गोष्टी एकाच वेळेस नाजूक व अवघड असतात. तिची खरी खोटी प्रेम प्रकरणे वाढली की नेमके लग्न कोणाशी हा प्रश्न उपस्थित होतो. यश, लोकप्रियता व वाढती मागणी यामुळे वय वाढत वाढत तिशीपार कधी जाते हेच समजत नाही व तेव्हाच आम्ही पत्रकार तिला लग्नाचे विचारातो. या प्रश्नामागची भावना अशी असते की तिने वेळीच लग्न केले तर बरेच. पण प्रश्नाचा सूर तिच्या खासगी गोष्टीत विनाकारण नाक खुपसण्यासारखा वाटतो. अभिनेत्री अगोदर स्त्री असते. त्या स्त्रीचा पूर्ण आदर असतोच. पण चित्रपटसृष्टीचा रंगढंग अथवा बिनधास्त बेधडक संस्कृती याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारा ठरलाय. कधी विवाहपूर्व संबंधाची तर कधी विवाहबाह्य संबंधाची चर्चा याच प्रश्नात विघ्न आणते. व्यक्ती व क्षेत्र कोणतेही असो, पुरुष अथवा स्री यानी वयाच्या गणितानुसार वेळेवर व व्यवस्थित लग्न करणे ही आपली परंपरा, संस्कृती व मूल्ये आहेत. पण कलाकाराचे पहिले लग्न त्याच्या काम, मेहनत व स्थान टिकवणे याच्याशी लागलेले असते व प्रत्यक्ष लग्नाच्या गोष्टीच बदलतात. काजोल योग्य वयात लग्न करते तर करिश्मा कपूरचा अभिषेक बच्चनशी साखरपुडा होऊनही तो मोडतो व ती संजय कपूरशी लग्न करते. दोन मुलाना जन्म दिल्यावर तेही वेगळे होतात. त्याचेही हे दुसरे लग्न व अर्थातच दुसरा घटस्फोट असतो. अभिषेकचा ऐश्वर्या रायशी प्रचंड थाटामाटात विवाह होतो. तीन दिवस जुहू परिसरात या लग्नाची धूम व धून असते. सलमान खानने ऐशच्या घराबाहेर एका रात्री प्रचंड दारु पिऊन तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर ऐशची आई वृंदा राय यांनी ऐशचा सल्लूशी काहीही संबंध नाही असे पत्रकच काढलेले. या सार्‍यांच्या खमंग व खुसखुशीत बातम्या झाल्याने, तू लग्न कधी करतेस हा पत्रकारांचा प्रश्न योग्यच ठरतो. नटीच्या लग्नावर महामालिका होईल. इतक्या गोष्टी त्यात आहेत. शिल्पा शेट्टीशी लग्न करण्यासाठीच राज कुन्द्राने मुल लहान असतानाही पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. प्रत्येक अभिनेत्रीची लग्नाची गोष्ट काही वेगळेच सांगते. राजेश खन्नासोबत अंजू महेंद्रुचे लग्न होणार हे निश्चित होते पण ते डिंपल कापडियाशी झाले. स्टोरीमे ट्विस्ट ! विवाहित धर्मेंद्रने हेमा मालिनीशी गांधर्व विवाह केला. स्टोरी मे टर्न!! अनेक प्रकारची उदाहरणे आहेत. त्यात सत्यता किती व दंतकथा कोणत्या यावर अनेक जोडप्यांना वा घटस्फोट झाला असेल तर एकाला बोलते करावे लागेल. लग्नानंतर चित्रपटात भूमिका करणार का हा देखील काही वेळेस प्रश्न होतो. मोहसीन खानशी लग्न करून रिना रॉयला पाकिस्तानला जाण्यापूर्वी आम्हा काही पत्रकारांना पार्टी देताना भावनाविवश होताना मी अनुभवले. तेव्हा तिच्यातील स्त्री दिसली. दुर्दैवाने काही काळानंतर ती परतली. अभिनेत्रीचे लग्न म्हणजे प्रत्येक वेळेस टाईमपास नसतो हे खरेच. हाच विषय थोडा गंभीरतेने पाह्यचा तर नटीने अचानक लग्नाचे ठरवले तर निर्माता व तिचा स्टाफ गोंधळात पडतो. कारण एकाद्या निर्मात्याला भीती वाटते तिला प्रेक्षक पडद्यावर प्रेयसी म्हणून स्वीकारतील ना? तर तिच्या हेअर ड्रेसर, मेकअपला वाटते, मॅडमनी आता चित्रपटात भूमिका करणेच थांबवले तर? या विषयावरचा हा वेगळाच दृष्टिकोन ठरावा. किमी काटकरने असा अचानक लग्नाचा निर्णय घेताच सर्वप्रथम स्वीकारलेले चित्रपट सोडले. म्हणूनच “त्रिनेत्र “मधे तिच्या जागी शिल्पा शिरोडकर आली. अनेक अभिनेत्रीनी संसार व संस्कार सांभाळत नायिकेच्या भूमिका साकारल्यात. पण तो विषय वेगळाच.

बहुधा ग्लॅमर हाच कारकीर्दीचा आधार असणार्‍या नट्याना लग्नानंतर कारकीर्दीचे काय हा प्रश्न पडत असावा. काही अभिनेत्रीना आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे लग्नाचा विचार खूप पुढे ढकलावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. हिंदीतील अभिनेत्रींच्या लग्नातील गोष्टींचा गोडवा मराठीला किती हा प्रश्न पडू शकतो. सोशल नेटवर्किंगच्या काळात अनेक मराठी अभिनेत्री स्वतःच आपल्या लग्नाची गोष्ट अर्थात बातमी देतात. मराठीतील प्रेम प्रकरणांची चविष्ट कुजबुज असते पण त्याची फार चर्चा रंगत नाही. वा कोणी ब्रेकिंग न्यूज केल्याचे त्याना आवडत नाही. पण लग्नाचे कव्हरेज अनेकींना हवे असते. एकी दोघीना याबाबत नेमके काय करावे हे लक्षात न आल्याचे जाणवले. हिंदीत अभिनेत्रीच्या लग्नाचा थाटामाट लय भारी असतो हे माधुरी दीक्षितच्या लग्नाच्या रिसेप्शनमधे अनुभवले. तिचे लग्न १७ आक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत झाले हे तिचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथने ६ नोव्हेंबर रोजी आज तक वाहिनीला सांगितल्यावर अनेकांना जोरका धक्का धीरेसे लगा तेव्हा पहिला प्रश्न पडला डॉ. श्रीराम नेने दिसायला कसे आहेत? ही उत्सुकता फारच ताणली गेली हो… डिसेंबरच्या मध्यास अंधेरीतील द क्लब येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात हा जोडा छानच पहायला मिळाला. अभिनेत्री जेवढी मोठी तेवढाच तिच्या लग्नाचा बॅण्ड बाजा बारात मोठा असेच काही नसते. राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठीच आदित्य चोप्राने पहिल्या पत्नीस घटस्फोट दिल्याचीही चर्चा गाजली. तिने त्या काळात मीडियासमोर येणे खुबीने टाळले हे बरेच केले. कारण अशा गोष्टींवर जे सांगितले जाते त्यापेक्षाही ऐकले काही वेगळेच जाते व त्या सार्‍याला मिठमसाला लावून प्रसिद्ध केले जाते. आजच्या वाढत्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, सेल्फ ट्रॅव्हलर, लिव्ह इन रिलेशनशिप, व्यक्तीकेंद्रित मानसिकता, व्यावसायिक नाते या काळात या अभिनेत्रीना तू लग्न कधी करतेस असा प्रश्न करणे आवश्यक आहे का? सुष्मिता सेन लग्न संसार याशिवाय सुखात जगतेय. मुलं दत्तक घेता येते. सरोगेट मदरचा पर्याय आहेच. दीपिका पादुकोण रणवीर सिंहशी कधी बरे लग्न करणार हा प्रश्न लवकरच तिला विचारायला सुरुवात होईल हे परंपरेला धरुन होईल. प्रियांका चोप्राला अधूनमधून मुंबई वा भारतात असते त्यामुळेच तिला लग्नासाठी तूर्त वेळ नसावा. मध्यंतरी एका अभिनेत्रीने एका मुलाखतीत व्यक्त केलेले मत अगदीच वेगळे व या विषयाला नवे वळण देणारे आहे. ती म्हणाली, लग्न करण्यातील एक कारण लैंगिक सुख व मुल होणे वा आई होणे हेच आहे ना? त्यालाही पर्याय आहेच…. ही अमेरिकन विचार दृष्टी की युरोपीय याचा विचार नको. हा विचार होऊ लागलाय ही वस्तुस्थिती आहे. नटीच्या लग्नाची गोष्ट न संपणारी आहे हे पटलयं ना? कदाचित हा ट्रेलर ठरावा. पिक्चर अभी बाकी है तोपर्यंत अक्षता टाकून म्हणूया शुभमंगल सावधान..
– दिलीप ठाकूर