सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा होत असताना खुद्द सलमान मात्र एका वेगळ्याच कामात रमला आहे. ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आणि चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केल्यानंतर सलमान आणि सोहेल खान या दोघांनीही त्यांच्या भाच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

बहिण अर्पिता खानच्या मुलासोबत सलमानची चांगचीच गट्टी जमल्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तो अहिलसोबत मजामस्ती करत असतो. याचाच प्रत्यय सलमानने पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहून येत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान अहिलसोबत ‘सुलतान’ या चित्रपटातील गाणं म्हणत चक्क मारामारी करताना दिसतो. अर्थात मामा- भाच्याची ही मारामारी अतिशय गोड वाटत आहे. सोहेलने उचलून घेतल्यामुळे अहिललाही सलमानइतकंच मोठं झाल्यासारखं वाटत आहे. मुख्य म्हणजे चिमुकल्या अहिलने बी- टाऊनच्या ‘सुलतान’लाही हरवल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

सलमान आणि अहिलच्या नात्याविषयी सांगायचं झालं तर अहिल सर्वांचाच लाडका आहे. त्यातही सलमानने पोस्ट केलेले त्याचे फोटो आणि अहिलचे फोटो पाहता त्या दोघांचं नातं इतरांपेक्षाही जरा जास्त खास आहे असंच म्हणावं लागेल. भाच्यासोबत धमाल करणारा हा ‘दबंग’ अभिनेता लवकरच कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान सोबतच अभिनेता सोहेल खान, चिनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन रे तंगू आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही झळकणार आहे. कबीरच्या या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर…’ च्या निमित्ताने सलमान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

वाचा: … आणि मलायकाने ‘खान’ आडनाव काढायला सांगितले