एस एस राजामौलीच्या ‘बाहुबली द कन्क्लूजन’ने सर्वांना अक्षरशः वेड लावले. जो तो याच चित्रपटाची चर्चा करतो आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बाहुबली २’ ४०० कोटींचा गल्ला पार करेल, असे म्हटले जातेय. पहिल्याच दिवशी १२५ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा रेकॉर्ड आता कोणता चित्रपट मोडणार असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल. सध्यातरी कोणता चित्रपट हा रेकॉर्ड मोडेल ते सांगता येणार नाही. पण, मे महिन्यातही तुमचे भरघोस मनोरंजन होणार हे नक्की सांगू शकतो. २०१७चा मे महिना मनोरंजन विश्वासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काही महत्त्वाचे चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘सरकार ३’
राम गोपाल वर्माच्या सरकार सिरीजमधील ‘सरकार ३’ चित्रपट येत्या १२ मे ला प्रदर्शित होत आहे. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हे या चित्रपटातही सुभाष नागरेच्या (सरकार) मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्या लूकने आधीच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेता मनोज बाजपेयीचीदेखील यात प्रभावी भूमिका असून, अभिनेत्री यामी गौतम यात अन्नू करकरे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रोनीत रॉय हा पराग त्यागीची भूमिका साकारत असून, अमित सध हा शिवाजी (चिकू) नागरेच्या भूमिकेत दिसेल. भरत दाभोळकर यात गोरख रामपूरच्या भूमिकेत तर रोहिणी हट्टंगडी या रुक्कू बाई देवीच्या भूमिकेत दिसतील.

sarkar-3

‘मेरी प्यारी बिंदू’
आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची टक्कर ‘सरकार ३’शी होणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता आयुषमान पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे बी- टाऊनमध्ये एका नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यशराज बॅनर अंतर्गत आकारास आलेल्या या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्माने केली असून, प्रेमाचा एक वेगळा प्रवास सांगणारा हा चित्रपट १२ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

meri-pyari-bindu-759

‘चि. व चि. सौ. कां.’
‘एलिझाबेथ एकादशी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांची जोडी पुन्हा एकदा सर्वांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘चि. व चि. सौ. कां.’ मेच्या १९ तारखेला प्रदर्शित होईल. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. ‘चि. व चि. सौ. कां.’ हा लग्नबंबाळ, धमाल गोतावळा तसेच सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

chi-va-chi-sau-ka-poster

‘हाफ गर्लफ्रेंड’
आयुषमान-परिणीतीप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपट लेखक चेतन भगतच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. याआधीचे श्रद्धाचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे मेच्या १९ तारखेला प्रेम, रोमान्स आणि त्यानंतरच्या दुराव्याच्या कहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

half girlfriend

‘ओली की सुकी’
‘ती सध्या काय करते’ या चित्रपटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा ‘ओली की सुकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुलांमध्ये बदल घडवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाची मानसिकता ही महत्त्वाची असते. ‘ओली की सुकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून लहान वयात गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मुलांची कथा मांडण्यात आली आहे. ‘नलिनोत्तम प्रोडक्शन’ची निर्मिती असलेला ‘ओली की सुकी’ हा चित्रपट मेच्या २६ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

tejashree

‘बेहेन होगी तेरी’
राजकुमार राव आणि श्रुती हसन यांची रोमॅण्टिक कॉमेडी असलेला ‘बेहेन होगी तेरी’ २६ मे ला प्रदर्शित होईल. अजय पन्नालाल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती ऑडबॉल मोशन पिक्चर्सने केली आहे.