आगामी ‘दंगल’ या वर्षातला असा चित्रपट आहे जो बघण्यासाठी सारेच उत्सुक असतील. या चित्रपटासाठी करावी लागलेली मेहनत ही इतर चित्रपटांपेक्षाही जास्त आहे. चित्रपटात कुस्तीपटू गीता आणि बबिता बाबर यांच्या भूमिका साकारणा-या फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा, सुनाही भटनागर आणि जायरा वसी यांनी आमिरपेक्षाही जास्त मेहनत घेतली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दरम्यान, या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, बॉलीवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान याला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जोराचा झटका दिला आहे. आमिरच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा आगामी दंगल चित्रपटात रजनीकांत यांनी आमिरच्या व्यक्तिरेखेला तामिळमध्ये आवाज देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुद्द आमिरनेच रजनीकांत यांना डबसाठी विचारणा केली होती.

रजनीकांत यांच्या जवळच्या सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, आमिरने रजनीकांत यांच्यासाठी दंगल चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. त्यावेळी त्याने दंगल चित्रपटाचे तामिळमध्ये डब करण्यासाठी रजनीकांत यांना विचारणा केली. रजनीकांत यांना हा चित्रपट खूप आवडला. पण त्यांनी नम्रपणे चित्रपटास डब करण्यास नकार दिला.

दरम्यान, सर्वत्रच ‘दंगल’ या चित्रपटाची प्रशंसा आणि चर्चा सुरु असतानाच या चित्रपटाच्या शिर्षकगीताचा ऑडिओ व्हर्जन दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता आमिर खाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती सर्वांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता या गाण्याचा व्हिडिओ  प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मुलीला मुलाशी कुस्ती करायला लावणार.. तुला तुझी इज्जर प्यारी नसेल पण आम्हाला आमची इज्जत प्यारी आहे..’ असे म्हणणा-या आखाड्याच्या आयोजकांशी आपल्या मुलींसाठी दोन हात करणा-या एका बापाची झलक यात पाहावयास मिळते. ‘हारना नही है गीता’ असे ओरडत आपल्या मुलीचे मनोबल वाढवणारा बापही यात दिसतो. विशेष म्हणजे व्हिडिओशेवटी तरुणपणातील महावीर सिंग फोगट म्हणजेच आमिर धोबीपछाड खेळी खेळत समोरच्याला चितपट करताना दिसतो. ‘तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल…..’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला खणखणीत आवाजाचे गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे. त्यामुळे गाण्याचे शब्द, त्याची चाल आणि एकंदर दलेर मेहंदी यांचा अवाज, पार्श्वभागात मिळणारा ढोलांचा ठेका या गाण्याच्या जमेच्या बाजू आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेल्या या प्रोत्साहनपर गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केले आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. आपल्या मुलींना कुस्तीसारख्या पुरुषी खेळामध्ये तरबेज बनवण्यासाठी आणि याच खेळामध्ये भविष्य घडवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेत आमिर दिसणार आहे. सध्या विविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ‘दंगल’चे सर्वच कलाकार व्यग्र आहेत. पण, प्रसिद्धीचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाचे प्रमोशन केले जात नाहीये. ‘दंगल’च्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटाच्या मेकिंगचे काही व्हिडिओ, आमिरच्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आणि अशा हटके मार्गांचा अवलंब करत ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आमिरने साकारलेली महत्त्वाकांक्षी वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.