टीव्हीवरील नावाजलेली मालिका ‘दीया और बाती हम’मधील सूरज राठी अर्थात अनस रशिद लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना अनस म्हणाला की, कुटुंबाने त्याच्यासाठी निवडलेल्या मुलीशी अनस लग्न करणार आहे. हीना असे या मुलीचे नाव असून ती अनसपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.

‘हो हे खरंय, मी घरच्यांच्या पसंतीनेच लग्न करणार होतो. अखेर कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीशी मी आता लग्न करणार आहे. आमच्या वयात १४ वर्षांचे अंतर आहे आणि आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. हीना खूप साधी मुलगी आहे. तिला माझ्या वयाची काहीच अडचण नाहीये. तिच्या बहिणीच्या मते मी आजही २६ वर्षांचाच दिसतो,’ असे अनसने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हीना पंजाबमधील मलेरकोट येथे राहते. अनसचे कुटुंबही येथेच राहते.

अनसने हेही सांगितले की, हीनाचे संपूर्ण कुटुंब ‘दीया और बाती’ या मालिकेचे चाहते आहे. त्यांच्या कुटुंबाला अनससारखाच जावई हवा होता. याआधी अनस टीव्ही अभिनेत्री रती पांडेला डेट करत होता. लग्न करण्याच्या मतभेदावरुन दोघंही २०१४ मध्ये वेगळे झाले. गेल्यावर्षी या दोघांनी साखरपुडा केला अशा चर्चाही रंगत होत्या. पण नंतर अनसने या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले. दीया और बाती ही मालिका संपल्यानंतर लग्न करणार असल्याचे अनसने सांगितले.

‘दीया और बाती’चा दुसरा पार्ट ‘तू सूरज मैं सांझ पियाजी नाम से’ ३ एप्रिलपासून सुरु होतो आहे. या मालिकेत अनस आणि दीपिका मात्र दिसणार नाहीत.