बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा हॉलिवूडपटांमध्ये झळकल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आमिरने हॉलिवू़ड चित्रपटामध्ये रस नसल्याचे म्हटले आहे. हॉलिवूडपटामध्ये काम करण्यास अजिबात उत्सुक नसल्याचे सांगताना आमिरने भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट केले. आमिर सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आमिरला हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याविषयी उत्सुक आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आमिर म्हणाला की, अमेरिकेमध्ये जाऊन त्यांच्या चित्रपटात काम करण्यात मला अजिबात रस नाही. मी फक्त भारतीय चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक आहे. भारतातील प्रेक्षकांशी माझे २५ वर्षापासूनचे नाते आहे. या नात्यातून मिळणाऱ्या प्रेमाचा मला आनंद घ्यायचा आहे.

यावेळी त्याने जागितक स्तरावर काम करुन लोकांचे मनोरंजन करणे चूकीचे नाही हे देखील स्पष्ट केले. मी वैयक्तिकरित्या हॉलिवूडच्या व्यासपीठावर उतरण्यास इच्छूक नाही, माझ्या कारकिर्दीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला या व्यासपीठाची गरज कधीच वाटत नसल्याचे आमिर यावेळी म्हणाला. हॉलिवूड चित्रपटामध्ये रस नाही याचा अर्थ आडमुठेपणाणे मी हॉलिवूडमध्ये कामच करणार नाही असा घेऊ नये, असेही आमिरने सांगितले. जर मला एखाद्या चांगला प्रकल्प मिळाला तर मी यासंदर्भात विचार करु शकतो. कलेसाठी कोणतीही सीमा नसते असे सांगत जपानच्या चित्रपटसृष्टीतून चांगला प्रस्ताव मिळाल्यास तो नक्की स्वीकारेन असे आमिरने म्हटले.

बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. गतवर्षीच्या सरशेवटी २३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा बॉक्सऑफिसवर कमाईची दंगल अद्यापही सुरुच आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाईचा विक्रम तर केलाच आहे. पण भारतामध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट परदेशात देखील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. एकंदरीत देशभरातच नव्हे तर जगभरात दंगल आणि आमिरसह फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील वाहवाह मिळवली. बहुचर्चित चित्रपटावर चौहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आमिरने पिळदार शरीरयष्टीसाठी केलेल्या मेहनतीचे देखील कौतुक झाले होते. याच वेळी महावीर सिंग फोगट साकारत असताना आमिरने दोन रुपातील व्हिडिओची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.