मुलगी म्हणजे एक सुंदर भेट असून तिचा सन्मान आणि आदर करायला हवा, असे महानायक अमिताभ यांनी म्हटले आहे. मुलगी ही सर्व दृष्टीने विशेष असल्याचे सांगत मुलींविषयी आपण गर्व बाळगायला हवा असे अमिताभ म्हणाले. मुलींबद्दल आपल्या भावना अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. मुलींना आदर आणि सन्मानपूर्वक वागणूक देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महानायक अमिताभ आणि जया बच्चन यांना श्वेता नंदा ही मुलगी आहे.  माझी मुलगी या विश्वातील सर्वात सुंदर मुलगी आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी समाजासाठी आणि देशासाठी मुलींचे अस्तित्व खास असल्याचे आणखी एक ट्विट देखील  अमिताभ यांनी केले आहे.

चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करत ‘स्टार स्क्रिन पुरस्कार २०१६’ हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. बी टाऊनमधील विविध कलाकार आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. शूजित सरकारच्या ‘पिंक’ या चित्रपटाचा स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळ्यांवर दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह या चित्रपटाच्या वाट्याला चार पुरस्कार आले आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि रितेश शाहला सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

[jwplayer YHMzbxSo-1o30kmL6]

‘पिंक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. रविवारी अमिताभ यांनी आपल्याला मिळालेला पुरस्कार मुलगी श्वेता नंदा हिला समर्पित करत मुलींचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. ‘पिंक’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसले होते. त्यांच्यासोबत तापसी पन्नू, अंगद बेदी, किर्ती कुल्हारी आणि एंड्रिया तरिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘पिंक’ या चित्रपटाद्वारे बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.