छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपण ऐकला आणि पाहिला आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता बॉलिवूडनेही घेतल्याचं पाहायला मिळते. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अजय देवगण लवकरच तानाजी मालुसरे यांच्यावर साकारल्या जाणाऱ्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

‘जागरण डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अजयने हे स्पष्ट केले की त्याने एका खास कारणामुळे हा सिनेमा स्वीकारला. अजय म्हणाला की, ‘तानाजी ही एक फार सुंदर व्यक्तिरेखा आहे. मी अशी व्यक्तिरेखा आजपर्यंत पाहिली नाही. आपल्या साऱ्यांना माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठे कार्य केले आहे. पण हे कार्य करताना त्यांना तानाजीसारख्या अनेक शिलेदारांची मोलाची साथ मिळाली. आज आपण सारेच महाराजांबद्दल बोलतो, पण तानाजी यांच्याबद्दल फार कोणी बोलत नाही. अशी व्यक्तिरेखा लोकांसमोर आणणे हे फार आव्हानात्मक काम आहे.’

अजयने सांगितले की, हा सिनेमा साकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, पण तरीही हा एक सुंदर प्रवास असेल. या सिनेमासाठी तो शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेणार आहे. अजयने पुढे सांगितले की, सिनेमात स्पेशल इफेक्टसचा वापरही महत्त्वपूर्ण असेल. आता प्रेक्षकांना हा सिनेमा कसा वाटतो हेच पाहावे लागेल.

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा सिनेमाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. तेव्हा आता ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींची गाथा अनुभवण्यासाठी उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.