बॉलिवूडचा ‘भिडू’ अभिनेता म्हणजेच जॅकी श्रॉफ याची प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात वर्णी लागली आहे. चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका जॅकी साकारणार असल्याने तो प्रभासला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

वाचा : ‘केबीसी’मुळे अशाप्रकारे बदललं पहिल्या विजेत्याचं आयुष्य; मात्र शोमुळे होऊ शकला नाही आयएएस

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकीने सदर वृत्ताला दुजोरा दिला. ६० वर्षीय या अभिनेत्याने म्हटले की, ‘सध्याच्या घडीला भारतातील सर्वाधिक आवडता अभिनेता असलेल्या प्रभाससोबत साहो चित्रपटाचा मीही एक भाग असल्याचा मला आनंद आहे. अशाप्रकारची भूमिका मी वठवू शकतो यावर निर्मात्यांचा विश्वास आहे हे कळल्यावर मला खरंच खूप बरं वाटलं. प्रभासच्या बाहुबलीचे दोन्ही भाग मला आवडले.’
तमिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘साहो’मध्ये जॅकी श्रॉफसोबत श्रद्धा कपूर, चंकी पांडे आणि नील नितीन मुकेश या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. दरम्यान, ‘साहो’मध्ये नक्की कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अखेर गेल्या महिन्याच्या सरतेशेवटी श्रद्धा कपूरची चित्रपटात वर्णी लागल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद श्रद्धाने ट्विटरवर व्यक्त केलेला. तिने लिहिलेलं की, ‘साहो टीम आणि प्रभाससोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

वाचा : बॉलिवूडमध्ये आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकण्यास सज्ज

अॅक्शन ड्रामापट असलेल्या ‘साहो’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये सेट उभा करण्यात आलाय. ‘साहो’ची गाणी अमित भट्टाचार्यने लिहिली असून त्यास शंकर, एहसान, लॉय हे त्रिकूट संगीत देणार आहेत.