विद्या बालनचा बहुचर्चित सिनेमा ‘कहानी २’ ने पहिल्याच दिवशी ४.२५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा संपूर्ण देशात फक्त १२३५ थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘कहानी २’च्या कलेक्शनचा आकडा ट्विट केला आहे. हा सिनेमा जास्त करुन संध्याकाळी आणि रात्रीच दाखवण्याकडे भर दिला जात आहे.

नोटा बंदीचा चांगलाच फटका ‘रॉक ऑन २’ आणि ‘फोर्स २’ या सिनेमांना बसल्यामुळे विद्या बालनच्या ‘कहानी २’ लाही याचा फटका बसणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. तसेच बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ या सिनेमाच्या बरोबर एक आठवड्यानंतर लगेच सुजॉय घोषचा हा कहानी २ प्रदर्शित करण्यात आला. ‘डिअर जिंदगी’ने पहिल्या आठवड्यात ४७ कोटींची कमाई केली होती.

संपूर्ण भारतात पहिल्या दिवशी सकाळच्या शोसाठी १५ ते २० टक्केच लोक हा सिनेमा पाहायला येत होते. मात्र कोलकत्तामध्ये मात्र या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोलकत्त्यामध्ये सकाळच्या शोला ४० ते ५० टक्के लोकांनी प्राधान्य दिले आहे. आता हा सिनेमा त्याच्याबद्दल लिहून आलेल्या रिव्ह्यूवर आणि लोकांनी केलेल्या प्रशंसेवरच जास्तीत जास्त बॉक्स ऑफिस गल्ला करु शकतो. तसेच कहानी या पहिल्या सिनेमाच्या यशाचाही कहानी २ ला फायदा होईल.

रोमॅण्टिक सिनेमे, अॅक्शनपट यांसारखे सिनेमे बघून कंटाळा आला असेल तर ‘कहानी २’ हा रहस्यपट सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. पहिल्या दिवशी कहानी २ सात ते आठ कोटींचा गल्ला करेल असे वाटले होते. पण आतापर्यंत ४.५ कोटींचा गल्ला कमवण्यात या सिनेमाला यश आले आहे. असे असले तरी अनेक मल्टिप्लेक्समध्ये ‘कहानी २’ चे शो लावण्यात आले आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी हा सिनेमा चांगली कमाई करेल अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटाबंदीचा फटका ‘कहानी २’ ला बसेल का असे या सिनेमाचा दिग्दर्शक सुजॉयला विचारले असता तो म्हणाला की, ‘नोटाबंदीचा फटका सिनेमाला अजिबात बसणार नाही. ही एखाद्या गोष्टीला प्राधान्य देण्याची गोष्ट आहे. जर लोकांना ‘कहानी २’ हा सिनेमा बघायचाच असेल तर ते नक्कीच बघतील. मग देशात नोटाबंदीचे संकट असले तरी लोकं नक्कीच हा सिनेमा पाहतील. देशात नेहमीच काही ना काही होत असते. लोकांना या सिनेमाचा ट्रेलर फार आवडला. त्यामुळे मला आशा आहे की ते हा सिनेमा नक्की बघतील,’ असे सुजॉय म्हणाला.

कहानी २ मध्ये विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा हिट होणे हे विद्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहे. कारण याआधीचे तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले होते.