‘द कपिल शर्मा शो’ या विनोदी मालिकेत विनोदवीर कपिल शर्मा एका नव्या व्यक्तीरेखेचा समावेश करणार आहे. शोमध्ये कपिल शर्मा ‘कप्पू’ची व्यक्तिरेखा साकारत असून, आता कप्पूचा भाऊ ‘गप्पू’चेदेखील शोमध्ये आगमन होणार आहे. खुद्द कपिलने याची घोषणा आपल्या टि्वटर खात्यावरून केली. “कप्पूचा भाऊ गप्पू… लवकरचं येत आहे,” असा संदेश त्याने टि्वटरवर लिहिला आहे. कपिलने एक छायाचित्रदेखील पोस्ट केले आहे. छायाचित्रासह त्याने “मी आहे गप्पू आणि मी कप्पूचे टि्वटर खाते हॅक केले आहे,” अशी गंमतीशीर कॅप्शनदेखील लिहिली आहे. अगोदरच्या शोप्रमाणे या शोमध्येदेखील तो दुहेरी भूमिकेत दिसेल. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये कपिलने ‘बिट्टू’ आणि ‘सिट्टू’ अशा व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. ‘कॉमेडी नाईट्स…’ मध्ये ‘बिट्टू’ आणि ‘सिट्टू’ एकमेकांचे भाऊ होते. सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मा, अली असगर, सुनील ग्रोवर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर ही मंडळी अभिनय करताना नजरेस पडतात. कपिलचा शो सोडून ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’मध्ये गेलेली उपासना सिंगदेखील कपिलच्या शोमध्ये परतली आहे. नवजोत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’मधून बाहेर पडणार असल्याचे वृत्त मध्यंतरी माध्यमांतून झळकले होते. परंतु, संबंधित सूत्रांनी याचे खंडन केले आहे.