आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘हीरो’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘तूफान’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक हिट सिनेमांत काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीला तुम्ही आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून मिनाक्षी बॉलिवूडपासून दूर राहिली आहे. पण सध्या तिने सोशल मीडियावर आपले नुकतेच काढलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमध्ये वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. पण असे असले तरी ती आजही सुंदर दिसते. ती आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आहे.

मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंतग आहे. मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते.

मिनाक्षीने १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘इव्हज् वीकली मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता. तिने जपानमध्ये झालेल्या ‘मिस इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी मिनाक्षीला हिरो सिनेमात जॅकी श्रॉफची हिरोइन म्हणून सर्वांसमोर आणले होते. हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमामुळे मिनाक्षी एका रात्रीत स्टार झाली होती.

बॉलिवूडमध्ये परतणार का या प्रश्नाचे उत्तर देताना मीनाक्षीने अजूनपर्यंत काहीच निश्चित नसल्याचे म्हटले. लग्नानंतर तिला कुटुंबाला प्राधान्य द्यायचे असल्यामुळे तिने सिनेमात काम करणे बंद केले होते. तिची मुलगी पदवीधर झाल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पूनरागमन करण्याचा विचार करेल.

मिनाक्षीने तिच्या करिअरमध्ये ऋषी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, आणि विनोद खन्ना अशा सुपरस्टार्ससोबत अनेक सिनेमांत काम केले.