‘रंगून’…विशाल भारद्वाज यांच्या प्रत्येक चित्रपटाबदंदल प्रेक्षकांमध्ये ज्या प्रकारची उत्सुकता पाहायला मिळते अगदी त्याच प्रकारची उत्सुकता ‘रंगून’बद्दलही पाहायला मिळाली होती. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांचे विषय आणि एकंदर त्याचे कथानक नेहमीच वेगळ्या धाटणीचे असते. त्यामुळे ‘रंगून’ या चित्रपटाकडून अनेकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. ‘जमादार नवाब मलिक’, ‘ज्युलिया’ आणि ‘रुसी बिलीमोरिया’ यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाला एका वेगळ्याच पद्धतीने या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. प्रेमाच्या या त्रिकोणाला जोड आहे ती म्हणजे युद्धजन्य परिस्थिती, आझाद हिंद सेनेचा इतिहास आणि देशभक्तीची.

चित्रपटांमध्ये थरारक आणि साहसी दृश्ये करणारी अभिनेत्री ‘ज्युलिया’ म्हणजेच कंगना रणौतच्या अभिनयाची एक वेगळी छटा चित्रपटात पाहायला मिळत असली तरीही काही दृश्यांच्या वेळी मात्र तिच्या अभिनयात तोचतोचपणा दिसून येतो. अर्थात तो अंगावर येत नाही. तिने साकारलेली ज्युलिया अनेकांचीच दाद मिळवून जाते. अभिनेता सैफ अली खान आणि घरंदाज, रुबाबदार, गडगंज श्रीमंत व्यक्तिरेखा हे सर्व काही एकत्र आलं की सुरेख असं समीकरण बनल्याचं याही चित्रपटात पाहायला मिळत आहे. एका श्रीमंत पारसी कुटुंबातील रुसी बिलीमोरिया या माजोरड्या पण, ज्युलियाच्या प्रेमात तितक्याच विलीन प्रियकराची आणि एका निर्मात्याची भूमिका त्याने चांगलीच निभावली आहे. तर, शाहिद कपूरने साकारलेला जमादार नवाब मलिक आणि त्याचं खरं रुप यासाठी त्याने केलेला अभिनय हा दाद देण्याजोगा आहे. परिस्थिती आणि पडद्यावर सुरु दृश्याला अनुसरुन प्रेमात रंगून गेलेला नवाब मलिक आणि ज्युलिया यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे.

महायुद्ध, इंग्रजांचं भारतावर असणारं वर्चस्व, काही अती आत्मविश्वासू इंग्रज सैनिक आणि त्यांचे कपटी विचार या साऱ्याची जोडही चित्रपटाच्या कथानकाला देण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे एक पान या चित्रपटाच्या निमित्ताने का असेना पण, पुन्हा एकदा सर्वांसमोर आले आहे. नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्याच मुद्द्याला धरुन चित्रपटाचे कथानक वेगळी वळणं घेतं हे हळूहळू लक्षात येतं. चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल म्हणायचं झालं तर, वेळ कशी निघून जाते हे लक्षातही येत नाही. त्यामुळे आता उत्तरार्धात काय पाहायला मिळणार याचीच उत्सुकता वाढत जाते. पण, उत्तरार्धात चित्रपट काहीसा निराश करतो. काहीक गोष्टी उगाचच केल्यासारख्या वाटू लागतात. तर काही गोष्टींना उगाचच फिल्मी टच दिल्यासारखा वाटतो. पडद्यावर थरारक दृश्यं साकारणारी ज्युलिया म्हणजेच कंगना ज्यावेळी तिच्या चित्रपटासाठी नव्हे तर एका वेगळ्या कारणासाठी थरारक दृश्य करते तेव्हा ती पटतही नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध उगाचच ताणल्यासारखा वाटतो तो म्हणजे शेवटच्या काही क्षणांना.

कॅमेऱ्याने टिपलेली आणि चित्रपटाचं चित्रिकरण झालेली ठिकाणं नजरेत भरावीत अशीच आहेत. इथे विशाल भारद्वाज यांनी कॅमेरातून बरंच काही सांगितलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्श्वसंगीत ही ‘रंगून’ची जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यासोबतच चित्रपटात काही असे कलाकार भेटीला येतात की तुमच्याही भुवया उंचावतील. त्यामुळे या कलाकारांच्या येण्यानेही चित्रपटात एक वेगळाच रंग भरला आहे. गुलजार, विशाल भारद्वाज एकत्र आल्यावर एक वेगळाच सूर गवसतो. जो या चित्रपटाच्या निमित्तानेही गवसला आहे. ‘अलविदा..’पासून ते, ‘ये इश्क है’ या गाण्यापर्यंतची सर्वच गाणी आणि त्यातही गाण्यासाठी अरिजित सिंग, रेखा भारद्वाज, सुनिधी चौहान आणि इतर गायकांची लाभलेली साथ म्हणजे क्या बात. प्रेम, गुपितं, गनिमी कावा, युद्ध, राष्ट्रप्रेम, थरार या साऱ्याचा मेळ साधत ‘रंगून’ गेलेला हा चित्रपट म्हणजे प्रेमात रंगून गेलेली आणि प्रेमाच्या प्रवाहात काहीशी वाहत गेलेली गोष्ट सांगतो.

दिग्दर्शन- विशाल भारद्वाज
कलाकार- शाहिद कपूर, कंगना रणौत, सैफ अली खान, रिचर्ड मॅक् केब आणि सहकलाकार…
संगीत दिग्दर्शन- विशाल भारद्वाज
सिनेमॅटोग्राफी- पंकज कपूर

-सायली पाटील
ट्विटर- @sayalipatil910
sayali.patil@indianexpress.com