उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु दिले जाणार नाही. तसेच या कलाकारांनी २५ सप्टेंबरपर्यंत भारत सोडून पाकिस्तानमध्ये परतावे असा ‘अल्टिमेटम’ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केला होता. याचा फटका दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटालाही बसत आहे. या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत असलेला अभिनेता फवाद खान याला विरोध केला जात असल्यामुळे तो आता पाकिस्तानला परतल्याचे कळते. त्यानंतर बॉलीवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान आता करण जोहरच्या मदतीला धावून आला आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट कोणताही अडथळा न येता प्रदर्शित व्हावा यासाठी बॉलीवूडमधील सर्व कलाकारांपैकी सलमान खान पुढे सरसावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याचे कळते. सलमान आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्याने राज यांना फोन करून ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट अडथळ्याविना प्रदर्शित व्हावे अशी विनंती केल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. जर हे वृत्त खरे असेल तर यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तसं बघायला गेल तर सलमान खान आणि करण जोहर यांच्यात काही फारसे चांगले संबंध नाही. पण करणसोबतचे जुने वाद विसरून सलमान त्याच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी ऐश्वर्या राय बच्चन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर यातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतही सलमानचे वैयक्तिक कारणावरून वाद आहेत. ‘रईस’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.