आपल्या मित्र-मैत्रिणीचे खराब फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना टॅग करणं हा सर्वांचाच आवडचा छंद असेल. त्या व्यक्तीसाठी तो फोटो कितीही लाजीरवाणा असला तरी त्यावर मजा घेणाऱ्या मित्रांची संख्या काही कमी नसते. पण या अशा गोष्टी फक्त तुम्ही आम्हीच करतो असे नाही तर, सेलिब्रिटीही करतात. आता फराह खानचंच घ्या ना… फराह, करण जोहर आणि शाहरुख खान या तिघांच्या मैत्रीबद्दल तर साऱ्यांनाच माहिती आहे. फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या तिघांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आपल्याला आवडणारे कलाकार आधी असे दिसायचे का? असा प्रश्न अनेकांना पडेल. या त्रिकूटाची १७ वर्षांहून अधिक जुनी मैत्री आहे.

आपल्या फोटोंना कॅप्शन देत फराहने लिहिलंय की, ‘८० च्या दशकाची थीम असलेल्या एका पार्टीमधे आम्ही तिघं असे दिसत होतो. या फोटोत आमच्या दोघांकडे बघताना शाहरुखचा चेहरा बघण्यासारखा आहे.’ याआधीही करण जोहरच्या वाढदिवसाला त्याला अनोख्या शुभेच्छा देण्यासाठी फराहने तिच्या लग्नातला एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. करणच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण फराहने पोस्ट केलेल्या या फोटोनेच अनेकांची मनं जिंकली.

परिणीती, का खोट बोलते आहेस? फेसबुकच्या माध्यमातून वर्गमित्राचा सवाल

दरम्यान, निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतला शाहरुख, आर्यन आणि सारा यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केजोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अभिनेता अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि इतरही सेलिब्रिटी आले होते. छायाचित्रकारांना यापैकी जवळपास सर्वच कलाकारांचे फोटो काढण्याची संधी मिळाली. पण, नेमकं शाहरुख या पार्टीमध्ये कधी आला याचा सुगावा प्रसारमाध्यमांनाही लागला नाही.