सध्या शाहरूख खानच्या फॅन या चित्रपटातील अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतूक केले जात आहे. शाहरूखने या चित्रपटात सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा हार्डकोर फॅन गौरव चन्ना या दोन तोडीसतोड अशा भूमिका साकारल्या आहेत. मात्र, प्रेक्षकांना शाहरूखने साकारलेला २५ वर्षांचा गौरव अधिक भावला. अर्थात ५० वर्षांच्या शाहरूखचे २५ वर्षांच्या तरूणामध्ये रूपांतर करण्यासाठी ‘फॅन’च्या संपूर्ण टीमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. शाहरूखच्या या मेकओव्हरसाठी जागतिक स्तरावरील अनेक नामवंत मेकअप आर्टिस्टनी आपले कौशल्य पणाला लावले होते. मात्र, काही केल्या गोष्टी जुळून येत नव्हत्या. अखेर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेकअप आर्टिस्ट ग्रेग कॅनम यांनी हे आव्हान स्विकारले. ग्रेग कॅनम यांनी शाहरूखचा कायापालट गौरव खन्नामध्ये कसा काय केला, याचा एक व्हिडिओ ‘फॅन’च्या टीमकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ग्रेग यांचा मेकअप आणि व्हीएफक्सची कमाल या माध्यमातून गौरव चन्ना कसा साकारला, हे दाखविण्यात आले आहे. मेकअपच्या सहाय्याने एखाद्याचे वय जास्त दाखवणे सहज शक्य आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला त्याच्या वयापेक्षा तरूण दाखवणे खूपच अवघड असते, अशी प्रतिक्रिया फॅनचे दिग्दर्शक मनिष शर्मा यांनी व्यक्त केली. यासाठी ग्रेग यांनी शाहरूखच्या ‘डर’, ‘फौजी’, ‘सर्कस’मधील छायाचित्रांचा अभ्यास केला. इतके सगळे करूनही ग्रेग यांचा पहिला प्रयत्न फसला होता. त्यावेळी ग्रेग स्वत:च्या खोलीत जाऊन बसले आणि त्यांनी आजपर्यंत मेकअप केलेल्या कलाकारांचे चेहरे डोळ्यासमोर आणले. यामधील हॉलीवूड कलाकार ब्रॅड पीटसारखा मेकअप शाहरूखवर करता येऊ शकतो, याची जाणीव ग्रेग यांना झाली आणि पुढच्या प्रयत्नात त्यांनी शाहरूखचे २५ वर्षांच्या तरूणात रूपांतर केले. मात्र, शाहरूखला या मेकअपदरम्यान अनेक तास एकाच जागेवर बसून रहावे लागत असल्याने त्याला कंटाळा येत असे. हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर शाहरूखने ट्विट करून मी एकाच जागी तासनतास बसून राहण्याचे ते कंटाळवाणे तास कधीच विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, या व्यक्तिरेखेसाठी करण्यात आलेला मेकअप यापूर्वी कुणीही, स्वत: ग्रेग यांनीही केला नव्हता, असे सांगितले.