बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग आणि आभिनेता सलमान खान यांच्यातील वाद चित्रपट वर्तुळात चांगलाच चर्चेत आला होता. काही काळापूर्वीच अरिजित सिंगने फेसबुकवर सलमान खानची जाहीर माफी मागितल्यामुळे हे प्रकरण बरेच चर्चेत आले होते. पण अरिजितच्या जाहीरपणे माफी मागण्याने भाईजान सलमानवर मात्र काहीही फरक पडलेला नाही. अरिजित आणि सलमानमध्ये अजूनही विस्तव जात नाहीए. त्यामुळे खुद्द अरिजितनेच सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटात गाणे न गाणाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एका इंग्रजी संकेतस्थळानुसार अरिजित सिंगने यापुढे सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटासाठी गाणे न गाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यामध्ये एका पुरस्कार सोहळ्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासून त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटासाठी अरिजित सिंगने गायलेले गाणे सलमानने चित्रपटातून काढायला लावले होते. त्यानंतर आता त्याच्या ‘सुलतान’साठीही अरिजित सिंगने एक गाणे गायले होते. ते सलमानने चित्रपटातून काढू नये, अशी मागणी अरिजित सिंगने केली. त्याबद्दल त्याने ‘फेसबुक’च्या माध्यमातून सलमानची माफीही मागितली. अर्थात काही वेळाने अरिजितने ही पोस्ट काढूनही टाकली.
सलमानची माफी मागण्याचा याआधीही आपण अनेकवेळा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटूनही माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणूनच आता आपण ‘फेसबुक’च्या माध्यमातून माफी मागत असल्याचे त्याने पोस्टमध्ये लिहिले होते. मी तुमचा अपमान केला, असे तुमचे म्हणणे गैरसमज असल्याचे त्याने लिहिले आहे. आतापर्यंत आपण अनेक गाणी गायली आहेत. पण सलमान खानसाठी गायलेले एक गाणे तरी माझ्या संग्रही असावे, असे मला मनापासून वाटते. कृपा करून माझ्या भावना समजून घ्या, असे अरिजितने लिहिले होते.