विनोद खन्ना यांचे निधन

सत्तरीतील तरुणाईच्या खदखदत्या वातावरणाने तयार केलेल्या बंडखोर अभिनेत्यांच्या फौजेतील उमदे  शिलेदार, तारांकित आयुष्य सोडून अध्यात्माखातर मायानगरीतून संन्यास घेण्याची कृती करणारे धाडसी अवलिया आणि राजकारणाच्या निसरडय़ा वाटेवरून पुन्हा बॉलीवूडच्या वाटेवर रमणारे दांडगे अभिनेते विनोद खन्ना याचे गुरुवारी मुंबईत कर्करोगाने निधन झाले.

अभिनयाबरोबरच राजकारणातही सक्रिय असलेले विनोद खन्ना कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी गेली सहा वर्षे झुंजत होते. मात्र त्यांनी याबद्दलची माहिती गुप्त ठेवली होती. गेली काही वर्षे ते कर्करोगावर उपचार घेत होते. मध्यंतरी, गुरुदासपूरचे खासदार या नात्याने त्यांच्या मतदारसंघात खूप दिवसांनी भेट दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपल्या आजाराची वाच्यता केली. गेल्या महिन्यात अतिशय कृश आणि थकलेल्या विनोद खन्ना यांचे रुग्णालयात उपचारादरम्यानचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का  बसला होता. मात्र त्या वेळी उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती आणि त्यांना घरी सोडण्यात आले होते, अशी माहिती त्यांच्यावर महिनाभर उपचार करणाऱ्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.

विनोद खन्ना यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र गुरूवारी सकाळी  हरकिशनदास रुग्णालयात  त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे निवेदन रुग्णालयाने जाहीर के ले. विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या बॉलीवूडमधील सहकलाकारांनी मलबार हिल येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विनोद खन्ना यांचे पार्थिव रुग्णालयातून काही काळासाठी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर लगेचच शववाहिनीतून त्यांचे पार्थिव वरळी येथील वैकुंठभूमीत अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले.  विनोद खन्ना यांना गुरुवारी वरळी येथील वैकुंठभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला.  त्यांच्या पश्चात पत्नी कविता आणि चार मुले असा परिवार आहे.

सत्तरच्या दशकात विनोद खन्ना यांच्याबरोबर एकत्र काम केलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन आपले चित्रीकरण आटपून वरळी येथे आपल्या मित्राला, सहकलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित झाले होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, कबीर बेदी, रणबीर कपूर, ऋषी कपूर, रमेश सिप्पी, गुलजार, डॅनी डँग्झोपा, अर्जुन रामपाल, दिया मिर्झा यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, खासदार अरविंद सावंत हेही या वेळी उपस्थित होते. विनोद खन्ना ‘ओशो’ यांचे अनुयायी असल्याने त्यांचे अनेक अनुयायी या वेळी वैकुंठभूमीत उपस्थित होते. या अनुयायांनी त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली. वरळी वैकुंठभूमीबाहेरही आपल्या लाडक्या कलाकाराला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सर्वसामान्यांनी एकच गर्दी केली होती. विनोद खन्ना यांचा आजार गंभीर आहे याची जाणीव सगळ्यांनाच होती, मात्र  हा कलाकार इतक्या अचानक निघून जाईल, याची कल्पना  त्यांच्या सहकलाकारांनीही केली नव्हती.

‘ओशो’भक्ती आणि चित्रपट संन्यास

विनोद खन्ना यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक घडामोडींनी भरलेले असेच होते. १९७१ साली त्यांचा गीतांजली यांच्याशी विवाह झाला. अक्षय आणि राहुल ही त्यांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुले आहेत. मात्र आपली चित्रपट कारकीर्द उत्तम सुरू असतानाच विनोद खन्ना यांना ओशो यांच्या आध्यात्मिक विचारसरणीकडे ओढले गेले. १९८२ साली त्यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि कुटुंबालाही सोडून ते रजनीश यांच्या आश्रमात दाखल झाले. पाच वर्षे ते कुटुंबापासून दूर होते. त्याच काळात त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला.

१९८७ मध्ये ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले. त्यांनी डिम्पल कपाडियाबरोबर ‘इन्साफ’ या चित्रपटात काम केले. पुनरागमनानंतरही त्यांची कारकीर्द बहरली. या काळात त्यांनी ‘जुर्म’, ‘हमशकल’, ‘इन्सानियत के देवता’, ‘एक्का राजा रानी’, ‘इना मीना डीका’, ‘परंपरा’ अशा चित्रपटांतून काम केले. १९९० साली त्यांनी दुसरा विवाह केला. १९९७ साली त्यांनी आपल्या मुलाला अक्षय खन्नाला बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटाची निर्मिती केली. आत्ताच्या काळातही ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘रेड अलर्ट : द वॉर विदिन’ या अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपटांमधून काम केले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. चित्रपटाबरोबरच राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ते यशस्वीही ठरले. १९९७ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि ते पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या विनोद खन्ना शेवटपर्यंत गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार म्हणून कार्यरत होते.

‘बाहुबली २’चा प्रीमिअर रद्द

मुंबईत आज सर्वाधिक चर्चा आणि उत्सुकता होती ती ‘बाहुबली २’ या एस. एस. राजामौली दिग्दर्शित चित्रपटाच्या भव्य प्रीमिअर सोहळ्याची.. दोन वर्षांनी प्रदर्शित होणाऱ्या या सिक्वलपटाच्या प्रीमिअरसाठी निर्माता, वितरक करण जोहर याने भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ सगळे या सोहळ्याला खास उपस्थित राहणार होते. मात्र विनोद खन्ना यांच्या निधनाची वार्ता कळताच करण जोहर आणि राजामौली यांनी आजचा प्रीमिअर सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.