जैन मुनी तरुण सागर महाराज यांनी त्यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणारा संगीतकार विशाल ददलानीवर सोमवारी आपले मत मांडले. तरुण सागर म्हणाले की, कदाचित विशाल ददलानी याला जैन मुनी, जैन धर्म आणि परंपरा याच्याबद्दल फारसे माहित नसेल. ददलानी यांना जर याविषयी माहिती असती तर कदाचित त्यांनी अशी टिप्पणी केली नसती. जैन मुनी यांच्यावर विशाल ददलानी ट्विटरवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. या ट्विटला घेऊन विशालला अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. एवढेच नाही तर जैन समुदायच्या लोकांनी ददलानी विरुद्ध पोलिसात तक्रारही केली.
जैन मुनी तरुण सागर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ददलानीला फक्त एवढेच माहित आहे की दिगंबर साधु नग्न राहतात. त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल काही माहित नाही. जर त्यांना संस्कृतीबद्दल माहित असते तर त्यांनी अशाप्रकरची टिप्पणी केली नसती. माफी मागण्याच्या प्रश्नावर जैन मुनी म्हणाले की, ‘मी त्यांच्यावर रागावलोच नाही, तर माफ करण्याचा प्रश्न येतोच कुठे. पण, समुदायातले लोक जे माझा आदर करतात त्यांना मात्र वाईट वाटले म्हणून ते विरोध करत आहेत. सगळ्यांमध्येच चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत असली पाहिजे.’ जैन मुनी यांनी सांगितले की आठ महिन्यांपूर्वी ते दिल्ली विधानसभेत भाषण द्यायला गेले होते, पण शेवटच्याक्षणी त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सभापती राम निवास गोयल यांनी मला बोलवले होते.
तरुण सागर महाराज यांनी २६ ऑगस्टला हरियाणा विधानसभेत भाषण केले होते. ज्यावरुन विशाल ददलानी याने ट्विट केले होते. त्याने त्याच्या ट्विटमध्ये जैन मुनी यांचा फोटो टाकून लिहीले होते की, ‘तुम्ही जर यांना मतदान केले असेल तर त्यांच्या या वायफळ बडबडीला तुम्हीच जबाबदार आहात.’ त्याच्या या ट्विटनंतर लोकांनी ददलानीची खिल्ली उडवायला सुरुवात केली. या ट्विटवर त्याने माफीही मागितली. त्याच्या या ट्विटवर अरविंद केजरीवाल यांनीही आपत्ती दर्शविली होती. तो पुढे म्हणाला की, ‘ज्या लोकांच्या भावना मी दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागतो. पण भारताच्या हितासाठी राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत.’ विशालच्या या वक्तव्यावर दिल्लीचे आरोग्य आणि ऊर्जा मंत्री सत्‍येंद्र जैन यांनीही माफी मागितली. ‘माझा मित्र विशाल ददलानीच्या वतीने जैन समुदायच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. मी मुनी तरुण सागरजी महाराज यांची क्षमा मागतो.’ असे ट्विट सत्‍येंद्र जैन यांनी केले. ददलानी याने केजरीवाल आणि जैन यांचीही माफी मागितली. ‘मला फार वाईट वाटत आहे की मी माझे जैन मित्र, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या भावना दुखावल्या. यामुळे मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.’