‘वोग इंडिया’ या लाइफस्टाइल मासिकाने नुकतीच दहा वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने रविवारी मुंबईत ‘वोग’तर्फे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर या कलाकारांचं अनोखं ‘स्टाइल स्टेटमेंट’ पाहायला मिळालं. ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि शाहरुख खानसारखे मोठमोठे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.

ऐश्वर्या आणि शाहरुखने या पुरस्कार सोहळ्यात विशेष लक्ष वेधलं. रेड कार्पेटवरही दोघं एकत्र आले. ‘वोग इन्फ्लुएन्सर ऑफ द डिकेड’ हा पुरस्कार ऐश्वर्याला मिळाला तर ‘वोग एन्टरटेनर ऑफ द डिकेड’चा पुरस्कार किंग खानने पटकावला. तर ट्विंकल खन्नाला ‘वोग ओपिनियन मेकर ऑफ द इअर’चा पुरस्कार मिळाला आणि दिग्दर्शक करण जोहर ‘वोग मॅन ऑफ द इअर’ या पुरस्काराचा मानकरी ठरला.

वाचा : आदित्य पांचोली आणि झरीना वहाबने कंगनाला पाठवली मानहानीची नोटीस

या कार्यक्रमात सर्वांत मोठा पुरस्कार मिळाला तो म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्माला. ‘वोग अँड बीएमडब्ल्यू गेम चेंजर ऑफ द इअर’ हा पुरस्कार अनुष्काने पटकावला. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आनंद व्यक्त केला. आपल्या हटके फॅशनने सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरला ‘वोग अँड आयडब्ल्यूसी फॅशन आयकॉन ऑफ द इअर’ हा पुरस्कार मिळाला. इन्स्टागामवर फोटो शेअर करत सोनमने बहिण रिया कपूरचे आभार मानले. सोनमचे बरेच ड्रेसेस रिया डिझाइन करते.

सोशल मीडियावरही या पुरस्कार सोहळ्याची चर्चा पाहायला मिळाली. सेलिब्रिटींचे रेड कार्पेटवरील आणि कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. नीता अंबानी मुलगी ईशासोबत या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. तर रेड कार्पेटवर अर्जुन कपूर मामा अनिल कपूर यांचा आशिर्वाद घेतानाचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.