१४ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात गौरव
सिनेमा या भाषेचे कित्ते जाणीवपूर्वक गिरवले तरच या माध्यमाची भाषा चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल असे सांगत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी अस्तु चित्रपटाचा प्रवास उलगडला. आशियाई चित्रपट फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.
चित्रपट संस्कृतीचा चांगल्या प्रकारे प्रसार करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात केला जातो. ‘अस्तु’ चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा श्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन आगाशे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच फिल्म सोसायटी चळवळीतील योगदानाबद्दल कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते दिलीप बापट यांना यंदाच्या सत्यजित रे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.
या पुरस्कारामुळे काम करायला पाठबळ मिळालय हा पुरस्कार मी माझ्या पत्नीला व सहकाऱ्यांना समर्पित करतो अशा शब्दांत दिलीप बापट यांनी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. चळवळीच्या आठवणींना दिलीप बापट यांनी यावेळी उजाळा दिला.