वाशिमच्या २२ जणांना जंतुसंसर्गाचा फटका; डॉक्टरांच्या हलगर्जीचा नमुना
जंतुसंसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया सुरूच ठेवल्या, एवढेच नव्हे तर संसर्ग झालेल्या रुग्णांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्याऐवजी अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविल्यामुळे सुमारे २२ जणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर या सर्व रुग्णांना मुंबईतील तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी नऊ रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातील एकाच रुग्णास थोडीशी दृष्टी पुन्हा मिळाली आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश जारी करण्यात आले असून गेल्या महिनाभरात वाशिम रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या १७१ रुग्णांचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.
१३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेले काही रुग्ण डोळ्याला संसर्ग झाल्याचे तक्रार घेऊन रुग्णालयात आले होते. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी या रुग्णांना अकोला वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी पाठवून दिले. नऊ रुग्णांना अशा प्रकारे पाठविल्यानंतर आरोग्य उपसंचालकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली. अकोला येथे संसर्गावरील उपचारासाठी आवश्यक ती उपकरणे व तज्ज्ञ डॉक्टर असल्याची कोणतीही खातरजमा न करताच जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांना पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
२९ ऑक्टोबर रोजी या घटनेची माहिती मिळताच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तात्काळ या रुग्णांना मुंबईत आणण्याचे व जे. जे. रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश दिले एवढेच नव्हे तर स्वत: दोन दिवस जातीने जे. जे. रुग्णालयात उपस्थित राहिले. या घटनेच्या चौकशीचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले असून यातील दोशींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. १ ऑक्टोबरपासून झालेल्या १७१ शस्त्रक्रियांमधील रुग्णांना तात्काळ शोधून त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याच्या त्यांच्या आदेशानुसार डॉक्टरांची सहा पथके रुग्णांचा शोध घेत आहेत.
जे. जे. रुग्णालयात ३० ऑक्टोबरला अकरा रुग्णांना आणण्यात आले तर आज मंगळवारी दुपारी उर्वरित अकरा रुग्णांना दाखल करण्यात आले. या दुर्दैवी २२ रुग्णांमध्ये अकरा महिला असून बहुतेक सर्वजण साठीच्या पुढील असल्याचे जे. जे.चे अधिष्ठाते व नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. या रुग्णांपैकी नऊ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यातील एकाला थोडेसे दिसत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. उर्वरित शस्त्रक्रिया केलेल्यांपैकी किती लोकांची दृष्टी परत येईल हे दोन-तीन दिवसांनी समजेल असेही ते म्हणाले.

वाशिम जिल्हा रुग्णालयातील नेत्रशल्यविशारद डॉ. चव्हाण तसेच जिल्हा शल्यविशारद डॉ. मेंडे यांनी या शस्त्रक्रिया केल्या तसेच रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्याचे दिसून आल्यानंतर तात्काळ शस्त्रक्रियागृह बंद करून संबंधितांना कळवले नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘स्युडोमोनास’ म्हणजे उपकरणातील जंतुसंसर्गामुळे रुग्णांना संसर्ग होऊन अंधत्व आल्याचे दिसून आले आहे. गंभीर बाब म्हणजे, संसर्ग झाल्यानंतरही शस्त्रक्रियागृह बंद करून र्निजतुक करण्यात आले नाही व शस्त्रक्रिया सुरूच ठेवण्यात आल्या. शस्त्रक्रियेदरम्यान हातमोजे न बदलणे, उपकरणांचे ऑटोक्लेव न करणे आदी गंभीर गोष्टी आढळून आल्या. रुग्णांना तात्काळ मुंबईत हलवले असते तर यातील अनेकांचे डोळे वाचले असते.
– नागपूरच्या उपसंचालक , डॉ. पद्मजा जोगेवार व डॉ. इंदुलकर