शीव-पनवेल मार्गावर खारघर स्पॅगेटी येथे होणाऱ्या नव्या टोलधाडीमुळे पनवेलकरांना रस्ता तुळतुळीत वापरायला मिळेल. मात्र पनवेलमधून नवी मुंबईकडे ये-जा करताना खिशाला ६० रुपयांची कात्री लागणार आहे. यामध्ये कामोठे, खारघर, खांदा कॅालनी, खांदेश्वर, जुन्या पनवेलसोबत नवीन पनवेल या शहरांमधील चारचाकी वाहनचालक भरडले जाणार आहेत. टोलवसूली कंपनीला दरदिवशी २२ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली आणि कामोठे या शहरांमध्ये स्वत:चे चारचाकी वाहन असलेला नोकरदार वर्ग मोठय़ा प्रमाणात राहतो. यापकी अनेकांची कार्यालये सीबीडी बेलापूर येथे आहेत. आता पाच किलोमीटर अंतरासाठी या वर्गाला रोज ६० रुपये मोजावे लागणार आहेत. या मार्गावर ४५० मॅजिक रिक्षा आणि मारुती इको व्हॅन सतत फेऱ्या मारतात. त्यांनाही टोलधाडीचा फटका बसणार आहे. चौकट
३० रूपयांचे इंधन, ६० रूपयांचा टोल
कामोठे ते खारघर हे तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३० रुपयांचे इंधन लागते आणि नवीन होणाऱ्या टोलमुळे ६० रुपये टोल भरावा लागणार ही सरकारने वाहनचालकांना दिलेली शिक्षा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.