राष्ट्रवादी पक्षाचे मातब्बर नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या विविध निवासस्थानांवर मंगळवारी लाचलुतपत प्रतिबंधात्मक विभागाने छापे घातले. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथे एकाच वेळी हे छापे घालण्यात आले.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना येथील राज्य मध्यवर्ती संग्रहालय घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विशेष तपास पथकामार्फत भुजबळ कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. मंगळवारी सकाळी अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ कुटुंबियांच्या मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे घातले. या छाप्यांबाबत सुरुवातीला कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. सकाळी ९च्या सुमारास हे छापे सुरू झाले. एकूण १७ ठिकाणी घातलेल्या छाप्यांसाठी ७० अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात किमान ६ ते ७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. छापे घालण्यासाठी जाण्यापूर्वी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. संगणकातील डेटा कॉपी करण्यासाठी प्रिंटर, नोटा मोजण्याचे यंत्र सोबत नेले होते.
अंमलबजावणी संचालनालय  आज गुन्हा दाखल करणार
मुंबई : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर आज बुधवारी अंमलबजावणी संचालनालय गुन्हा (इसीआयआर) दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एसीबी ने दाखल केलेल्या गुन्ह्य़ाची प्रत मिळविली आहे. याचा अभ्यास करून अंमलबजावणी संचालनालयानेही भुजबळांवरील आरोप निश्चित केले आहेत. यामध्ये पैशांची अफरातफर आणि फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे.
आलिशान महालातून अधिकारी रिकाम्या हाती
मुंबई : छगन भुजबळ यांचे आलिशान बंगले, पॅलेसबद्दलच्या ऐश्वर्याच्या नवलकथा सर्वसामान्यांच्या नेहमीच चर्चेचे विषय होते. मंगळवारी जेव्हा त्यांच्या या बंगल्यांवर धाडी पडल्या तेव्हा खजिना हाती लागेल असे वाटले होते. मात्र अधिकाऱ्यांना मात्र रिकाम्या हातानेच परतावे लागले.
छगन भुजबळ यांच्या बंगल्यांवर छापे घालताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याचे अधिकारी जय्यत तयारीनिशी गेले होते. पैसे मोजण्याचे यंत्र, संगणकातील माहिती (डेटा) कॉपी करण्यासाठी प्रिंटर आणि मोठय़ा बॅगा सोबत नेल्या होत्या. प्रत्येक आलिशान घरांची कसून तपासणी करण्यात आली. बंगल्यांमध्ये छुपे द्वार आहे का, कुठे गुप्त कोपऱ्यात काही दडवून ठेवले आहे का त्याची तपासणी करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या हाती काही लागले नाही. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा भुजबळ यांच्याविरोधात उघड चौकशी करण्याचे आदेश मिळाले तेव्हाच आपल्या घरावर छापे पडतील, असे संकेत मिळाले होते, त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. भुजबळ कुटुंबीयांनी यापूर्वीच ६० किलो सोने, १० कोटींचे हिरे असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे केवळ या अधिकृत खजिन्यांचे दर्शन घेऊन पोलिसांना परतावे लागले. कुठल्याच राजकारण्यांच्या घरात पैशांचे घबाड कधीच मिळत नाही. सरकारी नोकरांप्रमाणे ते अशी चूक करीत नाहीत, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशीसाठी फडणवीस यांचाच पाठपुरावा
मुंबई :छगन भुजबळ आणि तत्कालीन पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीची मागणी करणारा अर्ज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस या नात्याने ३१ जुलै २०१२ रोजीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे दाखल केला होता. या तक्रारींच्या पुष्टय़र्थ काही टिपणे, सरकारी अहवाल, शासकीय खात्यांची काही निरीक्षणे आदी पाच खोके भरतील एवढी कागदपत्रेही त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त हिमांशु रॉय यांच्याकडे सादर केली होती. बेनामी कंपन्यांच्या नावाने आपल्या कुटुंबीयांनाच कंत्राटांचे वाटप करणे, सरकारी भूखंड गिळंकृत करणे, बेकायदा रीतीने शेतजमिनींचा वापर आपल्या कंपन्यांसाठी करणे, सरकारी जमिनी आपल्या कंपन्या, संस्थांसाठी वापरता याव्यात यासाठी चलाखीने वळविणे, सरकारी कंत्राटदारांकडून अवाजवी रीतीने देणग्या उकळणे आदी मुद्दय़ांचा या तक्रारीत समावेश होता.
लोणावळ्यात फार्महाऊस, बंगला
पुणे  : छगन भुजबळ यांच्या पुणे आणि लोणावळा येथील मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी केली.
पुणे एसीबीच्या एका पथकाने भुजबळांच्या लोणावळ्याजवळील अतवणे या गावातील फार्म हाऊसची तपासणी केली. हे फार्म हाऊस ६५ एकर जमिनीवर असून या ठिकाणी २ हेक्टरवर सहा बेडरुमचा बंगला आहे. व्यवस्थापक, माळी, सुरक्षा रक्षक यांना राहण्यासाठी स्वतंत्र कॉटेज आहेत. फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पुल, हेलीपॅड, २५ लाख लिटर पाणी असलेले शेततळे, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आढळून आला. या फार्म हाऊससाठी स्वतंत्र डीपी बसविण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील संगमवाडी येथील ग्राफिकॉन आर्केडमधील सदनिकेची तपासणी करण्यासाठी एसीबीचे एक पथक गेले होते. ही सदनिका एका संस्थेला भाडय़ाने दिलेली असून ती सध्या बंद होती.