जनता परिवाराच्या धर्तीवर काँग्रेसकडून प्रस्ताव आल्यास स्वतंत्र अस्तित्व ठेवून काँग्रेसबरोबर भविष्यात हातमिळवणी करण्याची तयारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दर्शविली असली, तरी आधी भाजपसोबतची सलगी बंद करा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिला.
राजकीय नेत्यांशी अन्य पक्षातील नेत्यांशी जरूर मैत्री असावी, पण राजकीय हितसंबंधांमध्ये ती आड येता कामा नये. राष्ट्रवादी आणि भाजपची सलगी वाढल्याची गेले अनेक दिवस चर्चा आहे. अगदी अलीकडेच विधान परिषद सभापतिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. तेव्हा आपण स्वत: शरद पवार यांची भेट घेऊन अविश्वास ठरावावर टोकाची भूमिका घेऊ नका, अशी विनंती केली होती. तरीही काँग्रेसच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याकरिता राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली होती. काँग्रेसबरोबर येण्याच्या पवार यांच्या भूमिकेचे स्वागत असले तरी राष्ट्रवादीने भाजपबरोबर वाढलेली सलगी आधी कमी केली पाहिजे, असे मत अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
भविष्यात शक्यतो निवडणूकपूर्व आघाडय़ा करू नयेत, अशीच काँग्रेसची भूमिका आहे. निकालानंतर समविचारी पक्षांबरोबर आघाडी होऊ शकते. अर्थात, आघाडीचा सारा निर्णय हा स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल. राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने राज्यातील १०० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत झाली. आपल्याला निवडणूक लढवायची नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले. आता कोणत्याही निवडणुकीत सर्व जागा लढवायच्या हे ध्येय समोर ठेवून तयारी केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये यापुढे प्रदेश पातळीवरून निरीक्षक नेमले जाणार आहेत. तसेच पक्ष संघटना कमकुवत असलेल्या ठाणे, जळगाव, बीड, पालघर आदी जिल्ह्य़ांमध्ये संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

नांदेडमध्ये घोटाळेबाजच विजयी
जिल्हा मध्यवर्ती बँकांचा निकाल हा जनमानसाचा कौल नाही. कारण या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील काही ठरावीक लोकच मतदान करतात, असे सांगत नांदेडमधील पराभव हा आपल्या विरोधातील कौल नाही, असे सांगण्याचा प्रयत्न खासदार चव्हाण यांनी केला. नांदेड बँक ज्यांच्यामुळे बुडाली तेच पुन्हा निवडून आले आहेत. या मंडळींनी बँकेचे जवळपास २०० ते २५० कोटी हडप केले आहेत. या संचालकांनी आधी रक्कम परत करावी, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली.