महाराष्ट्रात ‘मराठी बाणा’ दाखविणाऱ्या शिवसेनेबरोबर सत्तेसाठी ‘संग’ केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी घातली आहे. महाराष्ट्रात बिहारींना परप्रांतीय ठरवून त्यांच्याविरोधात कायम भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या पाठिंब्याने ज्यात भाजपने सत्ता मिळविल्याने महाराष्ट्रातील नेते प्रचारासाठी गेले, तर विरोधकांना आयतेच कोलीत मिळेल, अशी भीती भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे.

नक्की वाचा:- बिहारमध्ये भाजपची आश्वासनांची खैरात

त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह राज्यातील नेत्यांना प्रचारासाठी बिहारमध्ये येण्याचे निमंत्रण अजूनपर्यंत तरी केंद्रीय नेतृत्वाकडून पाठविण्यात आलेले नाही. पुढील टप्प्यात आम्हाला बोलाविले जाईल, असा दावा भाजपच्या राज्यातील उच्चपदस्थ नेत्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत भूमिपुत्रांना ‘न्याय’ मिळवून देण्यासाठी शिवसेनेने सातत्याने बिहारी आणि उत्तर भारतीयांना कायम विरोध केला आहे. त्याविरोधात लालूप्रसाद यादव यांनीही प्रचार केला आहे. राज्यात सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या अनेक निर्णय व भूमिकांना पाठिंबा दिला आहे.रिक्षा-टॅक्सीचे नवीन परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मराठी भाषा येत असल्यास आणि महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य असल्यासच परवाना मिळेल, अशी अट घालण्यात आली आहे. शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही समर्थन केले.

मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये रिक्षा-टॅक्सीच्या व्यवसायात बिहारी व उत्तर भारतीय तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठीची सक्ती करण्यास त्यांचा विरोध आहे. बिहारमधून रोजीरोटीसाठी मुंबई व राज्यात येणाऱ्या तरुणांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना प्रचारासाठी बिहारमध्ये पाठविल्यास विरोधकांना आयताच मुद्दा मिळेल. त्यामुळे त्यांना बिहार प्रचारापासून दूर ठेवण्याची रणनीती दिल्लीत आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिहारमध्ये या आठवडय़ात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, अनंतकुमार यांच्या सभा होणार आहेत.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून प्रचारसभेचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.