जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळाद्वारे भेटलेल्या तरुणींना लुबाडणाऱ्या एका ठकसेनाला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल मोगल (३३) असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत १४ तरुणींना अशापद्धतीने गंडा घातल्याचे प्रकरण समोर आहे आहे.
अब्दुल मोगल या भामटय़ाने जीवनसाथी डॉट कॉम या संकेस्थळावर समीर लांबे या नावाने आपले बनावट प्रोफाईल उघडले होते. मोठय़ा पगाराची नोकरी आणि आकर्षक दिसणाऱ्या तरूणाचा फोटो त्याने या प्रोफाईलवर टाकला होता. तेथून तरूणींशी संपर्क साधून त्यांना भेटायला बोलवत असे. त्यावेळी तो मोटारसायकलवर घेऊन जात होता. पण फोटोत दिसणारा तरुण तो नसल्याने मुली त्याला टाळत असत. पण तरीही काही तरी सबब सांगून तो या मुलींना कॉफी पिण्याच्या निमित्ताने हॉटेलात घेऊन नेत असे. वडील मस्कत मध्ये आहेत, आईचे मोटार अपघातात निधन झाले आहे, अशी बतावणी तो करीत असे. त्याचवेळी माझ्या बहिणीला अशीच सोनसाखळी किंवा अंगठी बनवायची आहे, असे सांगून त्यांचे दागिने बघायला घ्यायच्या बहाण्याने ते घेऊन पळ काढत असे, अशी माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक निगडे यांनी दिली. फसवल्या गेलेल्या तीन तरुणींनी त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.