राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडून देवनार कत्तलखान्यातील दुकानांना यासंबंधातील आदेश देण्यात आले. यातंर्गत प्रशासनाने देवनार कत्तलखान्यातील गायींची कत्तल करण्यात येणारी दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाकडून या आदेशाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर गाय, बैल, वासरू यांची हत्या करणाऱ्या दुकानांना टाळे ठोकण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. मात्र, त्यामुळे देवनार कत्तलखान्यातील अन्य मांसविक्रेत्यांवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. देवनार कत्तलखान्याच्या प्रशासनानेही आपण सरकारी आदेशांचे पालन करणार असल्याचे सांगितले. मात्र, मुंबईतील गोमांस विकणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अली कुरेशी यांनी आपण या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. कत्तलखान्यातील सुमारे १००० जणांचा रोजगार यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना शासनाच्या निर्णयाचा फटका बसल्याचेही त्यांनी म्हटले. याशिवाय, मुंबईत गोमांसाची विक्री करणाऱ्या तब्बल ९०० परवानाधारक आणि तितकीच परवाना नसणारी दुकाने या निर्णयामुळे बंद करण्याची पाळी आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रपतींनी गोहत्या प्रतिबंधक कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) राज्यात तात्काळ या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.