अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अडचणीत आली आहे. मुंबई महापालिकेने अनुष्का शर्माला बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुष्का शर्माला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार वर्सोवामधील बद्रिनाथ टॉवरच्या २० मजल्यावर अनुष्का शर्माचे घर आहे. हा संपूर्ण मजलाच शर्मा कुटुंबीयांच्या नावावर आहे. या इमारतीचे माजी सचिव सुनील बत्रा यांनी शर्मा कुटुंबीयांच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्सवर आक्षेप घेतला आहे. अनुष्का शर्माने मजल्याच्या पॅसेजमध्ये बेकायदेशीररित्या इलेक्ट्रिक बॉक्स लावल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शर्मा कुटुंबीयांने इमारतीच्या अन्य नियमांचेही उल्लंघन केल्याचा बत्रा यांचा आरोप आहे. बत्रा यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या क प्रभागातील सहाय्यक अभियंत्यांनी सहा एप्रिलरोजी अनुष्का शर्माला नोटीस बजावली आहे.

अनुष्का शर्माच्या प्रसिद्धीप्रमुखांनी मुंबई मिररशी बोलताना बत्रा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. परवानगी घेऊनच इलेक्ट्रिक बॉक्स लावले असा दावा अनुष्काच्या प्रवक्त्यांनी केला आहे. बत्रा यांच्या मालकीचा इमारतीतील १६ वा आणि १७ वा मजला आहे. बत्रा यांनी सर्वप्रथम अग्निशमन दलाकडे तक्रार केली होती. तिथे त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सांगितले. बत्रा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. अनुष्का शर्माच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्स हा धोकादायक असून तो तात्काळ हटवावा असे निर्देश महापालिकेने शर्मा कुटुंबीयांना दिल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे. बत्रा यांनी नोटीशीची प्रतच जाहीर केली आहे.

शर्मा कुटुंबाने पॅसेजमध्ये लाकडी फर्निचरही ठेवल्याने हे आणखी गंभीर प्रकरण असल्याचे बत्रा यांचे म्हणणे आहे. शर्मा यांनी एसीचा कॉम्प्रेसरही चुकीच्या ठिकाणी लावला असून यामुळे बांधकामाला तडे गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोसायटीच्या समितीचे शर्मा कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते कारवाई करत नाही. पण मी अपघाताची वाट बघू शकत नाही. म्हणून थेट महापालिकेकडे तक्रार केली असे बत्रा म्हणालेत. तर सोसायटीच्या अन्य सदस्यांनी बत्रा यांच्या हेतूवर शंका व्यक्त केली. बत्रा यांचे शर्मा कुटुंबीयांशी वाद आहेत. बत्रा यांनीच इमारतीमध्ये बेकायदेशीर काम केले आहे याकडेही एका स्थानिकाने लक्ष वेधले.