निकाल जाहीर करण्यावरून न्यायालयाच्या विद्यापीठाला कानपिचक्या

उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पदवीसाठीच्या सगळ्या म्हणजेच ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी मुंबई विद्यापीठातर्फे उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यावर उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे तथाकथित तंत्रज्ञान चांगले आहे. मात्र ते हाताळणारी आणि प्रशिक्षित माणसे हवीत. घाईगडबडीने हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्याचा वापर केला असता तर असा गोंधळ झाला नसता, अशा शब्दांत न्यायालयाने निकाल जाहीर करण्याबाबत घातलेल्या गोंधळावरून विद्यापीठाला कानपिचक्या दिल्या. शिवाय सर्व निकाल जाहीर असले तरी हा गोंधळ नेमका का उडाला, त्यासाठी कोण कारणीभूत आहेत आणि भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी काय करणार याचा खुलासा करण्याचेही न्यायालयाने विद्यापीठाला बजावले आहे.

१९ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल जाहीर करण्याचा दावा मागील सुनावणीच्या वेळेस विद्यापीठाने केला होता. मात्र या दाव्याबाबत साशंकता व्यक्त करत या तारखेपर्यंत निकाल जाहीर करावेच लागतील, असे बजावत न्यायालयाने विद्यापीठाला शेवटची संधी दिली होती.

न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेस उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सगळ्याच म्हणजे ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड्. रूई रॉड्रिक्स यांनी न्यायालयाला दिली.

उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे तथाकथित तंत्रज्ञान चांगले आहे, मात्र ते हाताळणारी आणि प्रशिक्षित माणसे हवीत. घाईगडबडीने हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्याचा वापर करायला हवा. त्यासाठी दहा वर्षे लागतील. मात्र कसलीच पूर्वतयारी न करता या तंत्रज्ञानाचा वापर केला गेल्याने आता जो गोंधळ उडाला तो तरी निदान झाला नसता, अशा शब्दांत न्यायालयाने विद्यापीठाला कानपिचक्या दिल्या.

दरम्यान, निकाल जाहीर करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले गेले. मात्र गणेशोत्सव आणि मंगळवारच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर तो जाहीर करण्यास विलंब झाल्याचा अजब दावा विद्यापीठाने आधी न्यायालयात केला होता. त्यानंतर गणेशोत्सव, बकरी ईद, अनंत चतुर्दशीच्या सुट्टय़ांसाठीही शिक्षकवर्ग सुट्टीवर असल्याचे सांगत या निकालाच्या विलंबासाठीच्या अजब दाव्यांची मालिका विद्यापीठाने सुरूच ठेवली होती.

खुलासा करण्याचे आदेश

सगळे निकाल जाहीर करण्यात आले तरी याचिका निकाली काढण्यास न्यायालयाने नकार दिला. हा गोंधळ नेमका का उडाला, त्यासाठी कोण कारणीभूत आहेत आणि भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी काय करणार याबाबत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच या सगळ्याचा प्रतिज्ञापत्राद्वारे दोन आठवडय़ांत खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला दिले.