लष्कराची पाश्र्वभूमी आणि कोर्टमार्शल प्रकरणावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग रविवार, २४ जुलै रोजी घाटकोपर येथील झवेरबेन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १८ जून रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला होता. ३७ दिवसांत नाटकाने रौप्यमहोत्सवी प्रयोगाचा पल्ला गाठला असून या नाटकावर ‘लोकसत्ता संपादक’ शिफारशीची मोहर उमटविण्यात आली आहे. अनामिका आणि रसिकानिर्मित व साईसाक्षी प्रकाशित ‘कोडमंत्र’ हे मूळ गुजराती नाटक असून स्नेहा देसाई या नाटकाच्या मूळ लेखिका आहेत. मराठी रूपांतर विजय निकम यांनी केले आहे.

सध्या मोजकी पात्रे घेऊन नाटक करण्याचा कल असताना ‘कोडमंत्र’ नाटकात कलाकारांची संख्या मोठी आहे. मुक्ता बर्वे, अजय पुरकर, उमेश जगताप, विक्रम गायकवाड, स्वाती, अतुल महाजन, मिलिंद अधिकारी, कौस्तुभ दिवाण, अमित जांभेकर, संजय महाडिक, फैज खान, अजय कासुर्डे, संजय खापरे यांच्यासह कॅडेट्स व अन्य २० हून अधिक कलाकार आहेत. रौप्यमहोत्सवी प्रयोग दुपारी सव्वाचार वाजता सादर होणार आहे.

कलाकारांशी संवाद

‘कोडमंत्र’ नाटकाचा पुढील प्रयोग सोमवार, २५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. या प्रयोगाच्या वेळेस ‘कोडमंत्र’ नाटकातील प्रमुख कलाकारांशी ‘लोकसत्ता’चे ‘फीचर एडिटर’ रवींद्र पाथरे संवाद साधणार आहेत.