शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली यांचा मुंबईतील शुक्रवारचा कार्यक्रम रद्द करावा लागला असला तरी काँग्रेसने हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. गुलाम अली यांनी होकार दिल्यास मुंबईकरांना त्यांच्या गझलांचा आनंद लुटता येईल, असा दावा काँग्रेसने केला आहे. हा कार्यक्रम झालाच तर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करून भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साहित्य, कला, मनोरंजन या क्षेत्रात राजकारण आणले जाऊ नये किंवा नैतिकतेचे धडे दिले जाऊ नये. गुलाम अली यांच्यासारख्या ज्येष्ठ गझलकाराचा कार्यक्रम रद्द झाल्याने मुंबईकरांची कुचंबणा झाली आहे. म्हणूनच त्यांचा कार्यक्रम मुंबई वा राज्यात आयोजित करण्याची काँग्रेसची योजना आहे. यासाठी गुलाम अली यांना पक्षाकडून लेखी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यावरच कार्यक्रम कधी आणि कुठे आयोजित करायचा याचा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
राज्य सरकारने गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला संरक्षण देण्याची तयारी दर्शविली होती, पण शिवसेनेच्या विरोधाने हा कार्यक्रम रद्द करावा लागल्याने मुख्यमंत्री व पर्यायाने भाजपला धक्का बसला. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने कार्यक्रम आयोजित केल्यास भाजप सरकार या कार्यक्रमाला चोख बंदोबस्त ठेवून शिवसेनेच्या विरोधातील हवा काढण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार गुलाम अली यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे मौन
नागपूर: शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेच्या असलेल्या विरोधाबाबत विचारले असता त्या विषयावर काही बोलायचे नाही, असे सांगितले.

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून कसुरींचा कार्यक्रम
ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमास विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नाकावर टिच्चून ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’ (ओआरएफ)ने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व परिसंवादाचे आयोजन १२ ऑक्टोबरला मुंबईत केले आहे. शिवसेनेने या कार्यक्रमाला विरोध केला असून आमच्या पद्धतीने निदर्शने केली जातील, असे पक्षातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या विरोधामुळे ओआरएफचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. कुलकर्णी हे भाजपच्या निकटच्या वर्तुळातील आहेत.