वाशी येथील खाडीपुलावरून गोवंडी पोलीस ठाण्याच्या एका हवालदाराने आत्महत्या केल्याची घडना रविवारी घडली. कमलाकर धमनस्कर (वय ४७) असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, घरासाठी बिल्डरने अपात्र ठरवल्याच्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
    नुकत्याच वाकोला पोलीस ठाण्यात तणावामुळे पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या पाश्र्वभूमीवर या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली.  
कमलाकर धमनस्कर २००६ मध्ये पोलीस हवालदार म्हणून पोलीस दलात दाखल झाले. सध्या गोवंडी पोलीस ठाण्यात ते हवालदार म्हणून कार्यरत होते. रविवारी दुपारी वाशी खाडीपुलावरून उडी मारली. वाशी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमनस्करना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत जागा मिळणार होती, मात्र या जागेवर त्यांच्या बहिणीनेही दावा केला होता. त्यामुळे बिल्डरने कमलाकर यांना या जागेसाठी अपात्र ठरविले होते. त्याच्या ताणामुळे कमलाकर यांनी आत्महत्या केल्याचा जबाब त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिला आहे. या प्रकाराची चौकशी करून मग गुन्हा नोंदविण्यात येईल, असे गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. टी. विधाते यांनी सांगितले.
कमलाकर यांची दोन वर्षांपूर्वी गोवंडी पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, १५ वर्षांचा एक मुलगा, नऊ वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे. मयत कमलाकर हे मुक्ती नगर परिसरात शिवाजी नगर भागात राहात होते. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही होडी/बोट चालकांना खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कमलाकर यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली.