महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच माहिती लपविली जात असून आपण वर्षभर मागणी करीत असूनही आवश्यक माहिती दिली जात नाही, असा थेट आरोप करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाच्या सरकारवरच हल्ला केला.

पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून मंत्रिपद सोडावे लागलेल्या खडसे यांची न्या. झोटींग आयोगामार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीचा अहवाल नुकताच सरकारला सादर झाला आहे. एमआयडीसीच्या ज्या जागेवरून हे सगळे प्रकरण घडले, त्यासंदर्भातील माहिती खडसे यांनी उद्योग विभागाकडे मागितली आहे. त्यामध्ये १९९५ पासून किती शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, त्यातील किती परत केल्या, जमीन खरेदी संदर्भातील काही सरकारी परिपत्रकांची मागणीही खडसे यांनी केली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही आपल्याला ही माहिती दिली जात नाही. या विभागात मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाल्यामुळे ही कागदपत्रे लपविली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर हक्कभंग आणू

विधानसभा अध्यक्षांनी आदेश देऊनही सरकार माहिती का लपवत आहे, असा सवालही त्यांनी केला. त्यावर अजित पवार, गणपतराव देशमुख आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही खडसे यांना समर्थन देताना माहिती अधिकारानुसार सर्वाना माहिती दिली जाते. खडसे तर लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना हवी ती माहिती मिळण्याचा हक्क आहे. सरकार ही माहिती का लवपत आहे अशी विचारणा केली. माहिती मिळणार नसेल तर हक्कभंग आणू, असा इशाराही त्यांनी दिला.