जगभरातील समीक्षकांनी गौरवलेल्या, देशातील सवरेत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या कलाकृतीमागची लेखिका, घराघरात बघितल्या जाणाऱ्या लोकप्रिय मालिकेची पटकथाकार..चित्रपट, नाटक, मालिका या सर्व माध्यमांमध्ये यशस्वीपणे वावरणारी लेखिका- अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी बुधवारी (दिनांक ६ मे)‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर येणार आहेत. मधुगंधाने लिहिलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटामागची तिची कथा या निमित्ताने उलगडणार आहे.
‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेची पटकथा मधुगंधाची आहे, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या आणखी एका लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री म्हणून त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. ‘लाली लीला’सारख्या नाटकामधून सशक्त अभिनेत्री म्हणून मधुगंधाने यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केले आहे. कुमारवयातच मधुगंधाने लिहायला सुरुवात केली.  कादंबरी, कथा लिखाणाबरोबर नाटककार म्हणूनही ती पुढे आली. ‘लग्नबंबाळ’सारखे व्यावसायिक रंगभूमीवर गाजत असलेले नाटक मधुगंधाने लिहिले आहे. ‘होणार सून..’ मालिकेसाठी मधुगंधाने लिहिलेल्या कथेवरून प्रेरणा घेत हिंदी आणि कन्नड मालिकाही सुरू झाल्या आहेत. लेखनासोबतच अभिनेत्री म्हणूनही काही वेगळ्या भूमिका मधुगंधाच्या वाटय़ाला आल्या. ‘एलिझाबेथ एकादशी’च्या निमित्ताने तिने प्रथमच चित्रपट निर्मितीची धुरा अंगावर घेतली आणि यशस्वी झाली.
 मनोरंजनाच्या क्षेत्रात वावरूनदेखील सर्जनशीलता जपणाऱ्या नव्या पिढीतील आश्वासक नावांमध्ये मधुगंधाचे नाव घेतले जाते. तिच्या आत्तापर्यंतचा प्रवास केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने उलगडणार आहे. व्यावसायिक मालिकांसाठीच्या कथालेखनाची बदललेली गणिते, तरुण नाटककार म्हणून जाणवणारी आव्हाने, ‘क्रिएटिव्ह रायटिंग’चे आजचे स्वरूप या विषयांवरही मधुगंधाला थेट प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना या वेळी मिळेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

* कधी – बुधवार, दिनांक ६ मे
* कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प)
* वेळ – सायंकाळी ६ वाजता.