एल्फिन्स्टन-परळ स्टेशनवरील पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला असतानाच याप्रकरणात रेल्वे मंत्रालयाचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र निधीअभावी पुल आणि अन्य कामे करणे शक्य नसल्याचे उत्तर रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे बुलेट ट्रेनपासून ते अगदी जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या केंद्र सरकारने या पत्राची दखल घेतली असती आणि निधी उपलब्ध करुन दिला असता तर ही वेळ ओढावली नसती अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन आणि मध्य रेल्वेवरील परळ या दोन स्थानकांना जोडणारा पुल अरुंद आहे. परळ- एल्फिन्स्टन भागात अनेक कार्यालये सुरु असून याशिवाय केईएम, टाटा यासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात जाण्यासाठीही हेच स्टेशन जवळचे आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या स्टेशनवरील पुल रुंद आणि प्रशस्त असणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टन आणि परळ येथे १२ मीटर रुंद पादचारी पुल बांधण्याची मागणी अरविंद सावंत यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वीच केली होती.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अरविंद सावंत यांना लेखी उत्तर दिले होते. प्रवाशांच्या सोयीसुविधासंदर्भात तुम्ही रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवले होते. प्रवाशांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे असते. पण कधी कधी पैशांअभावी किंवा तांत्रिक कारणांमुळे या मागण्या पूर्ण करणे शक्य होत नाही, असे सुरेश प्रभूंनी २० फेब्रुवारी २०१६ रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यास तयार असलेल्या केंद्र सरकारला प्रवाशांसाठी गरजेच्या असलेल्या पुलासाठी पैसे देता आले नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. या पत्राची दखल घेत प्रशासनाने या पुलासाठी पैसे उपलब्ध केले असते तर आज २२ प्रवाशांचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.