लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिला टप्प्याचे मतदान होण्यास चार दिवस उरले असताना राज्यभरात पैशांचा सुळसुळाट झाला आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या विदर्भापासून मराठवाडा आणि पुण्या-मुंबईपर्यंत सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात रोख रकमेची वाहतूक होत असल्याचे आढळून आले असून ही रोकड मतदारांमध्ये वाटण्यासाठीच नेली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातून तब्बल साडेचार कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर मतदारांमध्ये वाटण्यासाठी विदेशी मद्याची वाहतूकही जोरात सुरू आहे.
शुक्रवारीच, मुंबईमध्ये दादर येथे झालेल्या नाकाबंदीमध्ये सेनापती बापट मार्गावरून चाललेल्या दोन मोटारसायकलस्वारांकडे २५ लाख
रुपयांची रोकड सापडली होती. यापैकी एक जण पळून गेला, तर वहाब सुरिया (३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा पैसा निवडणुकीच्या कामासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शुक्रवारीच रात्री, नवी मुंबई पोलिसांनी कोपरी येथे एका
कारमधून ११ लाख रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी अशोक अय्यप्पा पक्काला (४७) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम वाशी सेक्टर १० येथील आपल्या भावाला घर बांधणीकरीता द्यायला चाललो होतो असे अशोक याने सांगितले असले तरी पोलीस अधिक तपास करत आहे. अशोक याला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी
सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातील राजाराम पुलाजवळ दत्तवाडी पोलिसांच्या तपासणीदरम्यान एका मोटारीत तीन लाख रुपयांची रोकड आढळून आली. याप्रकरणी मोटारीचा मालक विलास केंजळे (रा. सदाशिव पेठ) आणि चालक जीवन भीमराव उपेकर (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, सोलापूर जि’ाातील सांगोला तालुक्यात सांगलीच्या सीमेजवळ नाकाबंदीदरम्यान एका गाडीतून ४५ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.