मराठी नवकथेच्या क्षेत्रातील मानदंड आणि ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत गंगाधर गाडगीळ यांच्या समग्र कथा एकत्रित करुन त्याचे पंधरा खंडांमध्ये प्रकाशन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पॉप्युलर प्रकाशनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पातील आठ खंड या प्रू्वी प्रकाशित झाले असून ‘गंगाधर गाडगीळ समग्र कथामालिके’तील उर्वरित सात खंडांच्या कथा संग्रहांचे प्रकाशन ३० नोव्हेंबर रोजी मुलुंड येथे होणार आहे. पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ संचालित न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि संशोधक डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. पुस्तक प्रकाशनानंतर डॉ. टिकेकर गंगाधर गाडगीळ यांच्या कथावाङ्मयाविषयी आपले विचार व्यक्त करणार आहेत. गाडगीळ यांच्या कथांवर आधारित ‘कथागंगेच्या धारा’ही मालिका काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरुन प्रसारित झाली होती. या मालिकेचे पटकथा आणि संवाद लेखक विजय मोंडकर यांच्याशी ‘मला भेटलेले गंगाधर गाडगीळ’या विषयावर गप्पांचेही आयोजन या वेळी करण्यात आले आहे. मालिकेतील एका कथेची ध्वनिचित्रफीतही या वेळी दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र सेवा संघ, सु.ल. गद्रे सभागृह, मुलुंड (पश्चिम) येथे होणार आहे.गाडगीळ यांच्या विविध कथांचे संग्रह वेगेवगेळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केले असून या सर्व कथा एकत्रित पंधरा खंडांमध्ये प्रकाशित करण्याचा प्रकल्प पॉप्युलर प्रकाशनाने हाती घेतला. या उपक्रमाअंतर्गत ‘कडू आणि गोड’, ‘गुणाकार’, ‘तलावातील चांदणे’, ‘उन्ह आणि पाऊस’, ‘कबुतरे’, ‘पाळणा’, ‘वर्षां’ आणि ‘खरं सांगायचे म्हणजे’ हे कथासंग्रह या आधी प्रकाशित करण्यात आले आहेत. आता उर्वरित सात खंड या कार्यक्रमात प्रकाशित होणार आहेत. यात ‘काजवा’, ‘खाली उतरलेले आकाश’, ‘ओलं उन्ह’, ‘वेगळं जग’, ‘सोनेरी कवडसे’, ‘आठवण’ आणि ‘उद्ध्वस्त विश्व’ यांचा समावेश आहे.