कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने इगतपुरीच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात घडला, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मालगाडीचे घसरलेले डबे रूळावरून हटविण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, सध्या मध्य रेल्वेची वाहतूक कसाऱ्यापर्यंत न ठेवता आसनगावपर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा होण्याची ही काही पहिली वेळ नाही. लोकल प्रवास करणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना दररोज काही ना काही कारणांमुळे लोकलचा उशिर सहन करावा लागतो. मध्य रेल्वेवर जो काही ताण पडतो आहे त्यामुळे गाड्या उशिरानेच धावत असतात. अशा सगळ्या परिस्थितीत कसरा किंवा कर्जत या स्थानकांवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागते.

आता आज घडलेल्या मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. अशा घटना वारंवार घडूनही रेल्वे मंत्रालयाकडून या समस्यांवर ठोस उपाय योजण्यासाठी काहीही पावलं उचलली जात नाहीयेत. त्यामुळे लोकलने प्रवास करणारे प्रवासी रेल्वे व्यस्थापनावर संतापले आहेत. हा संताप अद्याप लोकांच्या मनात आहे अशा घटना सातत्यानं वाढल्या तर याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की.