वरचेवर परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या कुलगुरूंनी विद्यापीठांच्या कामासाठी वेळ द्यावा, यासाठी महिन्याभरापूर्वी राज्यपालांनी राज्यातील सर्व कुलगुरूंना परदेश दौरे आवरते घ्या, असे सुनावले. परंतु, तरीही अनेक कुलगुरूंचे दौरे सुरूच राहिल्याने विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यपालांना आता कडक भूमिका घेणे भाग पडले आहे. त्याचा पहिला फटका मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना बसला आहे. देशमुख यांना जर्मनी, दक्षिण कोरिया आणि चीन येथील दौरे आयत्यावेळी रद्द करण्यास राजभवनने भाग पाडले आहे.

पाच वर्षांच्या कार्यकाळात कुलगुरूंनी परदेशात ५० दिवसांहून अधिक रहिवास करू नये, असे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने ३० जुलैला पत्र पाठवून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना बजावले होते. कुलगुरूंच्या परदेश दौऱ्यांवर अंकुश आणताना राज्यपालांनी केंद्रीय गृह विभागाकडून आणि परराष्ट्र विभागाकडून मान्यता घेतल्याशिवाय दौरे करू नये, असे बजावले होते. या प्रकारचा कोणताही नियम आधी अस्तित्त्वात नव्हता. कुलगुरूंनी विद्यापीठातील कामाला वेळ द्यावा, यासाठी या मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यातही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांची विशेष तक्रार आहे. वारंवार परदेश किंवा अन्य ठिकाणी दौऱ्यांवर असलेल्या कुलगुरूंची भेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मिळत नाही, अशी तक्रार अधिकारी वर्गाकडून करण्यात येते. तक्रारीचा हाच सूर विविध शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीही लावतात. परंतु, आता राजभवनने कडक भूमिका घेतल्याने इंग्लंड, आर्यलड, फ्रान्स येथून निमंत्रणे येऊनही कुलगुरूंना ती बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहेत.

गेल्या वर्षभरात देशमुख यांनी इस्त्रायल, मॉस्को, चीन या ठिकाणी राज्यपालांच्या मान्यतेने भेट दिली आहे. नुकताच त्यांनी जर्मनी येथे जाण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, इतर मान्यता मिळविण्याच्या अटीवर राज्यपालांनी या दौऱ्याला परवानगी दिली. आतापर्यंत या अटीचा आग्रह राज्यपालांनी धरला नव्हता. मात्र, आयत्यावेळी ही अट घातली गेल्याने कुलगुरूंना शेवटच्या क्षणी दौरा रद्द करावा लागला. या पद्धतीने दक्षिण कोरिया आणि चीनचे दौरे कुलगुरूंना गुंडाळावे लागले आहेत.

मी विद्यापीठाच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात नाही. मला निमंत्रण देणाऱ्या संस्थेकडून हा खर्च उचलला  जातो. याआधी मी राज्यपालांच्या परवानगीनेच परदेश दौरे केले आहेत.

संजय देशमुख, कुलगुरू