भरती-ओहोटीचा आणि त्यांच्या वेळांचा संबंध यांच्याशी खरे तर सामान्यांना फारसे देणेघेणे असायचे कारण नाही. अनेक वर्षे भरती-ओहोटीची माहिती समुद्राशी संबंधित व्यापार, व्यवसाय, संशोधन करणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. पण २६ जुलच्या महापुरानंतर ज्या अनेक गोष्टी बदलल्या त्यात या भरती-ओहोटीबद्दलच्या जागरूकतेचा समावेश आहे. मोठा पाऊस आणि भरतीच्या वेळा यांचा मुंबईकरांनी धसका घेतला आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पुढील चार महिन्यांच्या भरतीच्या वेळा इमानेइतबारे जाहीर होऊ लागल्या. पण या भरतीच्या वेळा म्हणजे काय आणि त्या कोण, कशा ठरवते ते समजले की त्याभोवतीचे गरसमजही दूर होतात.

सकाळी पाऊस सुरू झाला की आज अमुक अमुक वेळेला समुद्राला मोठी भरती असून त्या वेळी तमुक उंचीच्या लाटा उसळतील असे बिनदिक्कत सांगितले जाते आणि ते चुकीचे असते. लाटांच्या उंचीवर भरती मोजली जात नाही. इथे पुन्हा एकदा आपल्या शाळेतल्या पुस्तकातील विज्ञान-भूगोलाचा संबंध येतो. चंद्राच्या स्थितीनुसार भरतीच्या वेळा ठरतात. चंद्र पृथ्वीच्या ज्या भागासमोर असतो तेथे समुद्राचे पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाते व भरती येते. पृथ्वीच्या अगदी उलट बाजूला त्या वेळी प्रतिआकर्षणामुळे भरती सुरू होते. या दोन्ही बाजूला पाणी खेचले गेल्याने साहजिकच पृथ्वीच्या मधल्या भागात ओहोटी लागते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी मारण्यासाठी साधारण २४ तास (२३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद) लागतात. त्यामुळे भरतीनंतर सहा तासांनी ओहोटी व पुन्हा भरती असे चक्र सुरू राहते. प्रत्येक दिवशी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी असते. भरतीची पातळी कमी अधिक होण्यामागे सूर्य कारणीभूत ठरतो. चंद्र आणि सूर्य एकाच बाजूला असतील तर त्या बाजूचे आकर्षण अधिक वाढते व मोठी भरती सुरू होते. चंद्र आणि सूर्य पूर्णपणे विरुद्ध बाजूला असतील तरीही अशीच स्थिती येते. त्यामुळेच अमावास्या किंवा पौर्णिमेला मोठी भरती असते. त्याला इंग्रजीत ‘िस्प्रग टाइड’ म्हणतात. सप्तमीच्या दरम्यान चंद्र हा सूर्याच्या काटकोनात असतो. त्या वेळी सूर्याचे आकर्षण चंद्राच्या आकर्षणातून वजा होते. भरती आणि ओहोटीच्या पातळीतील अंतरही कमी होते. त्याला ‘लीप टाइड’ म्हणतात. हे झाले पुस्तकातले ज्ञान. या माहितीवरून भरती म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ हे लक्षात आले असेल. लाटांच्या उंची म्हणजे भरती नव्हे. लाटा येतात त्या वाऱ्यामुळे.

मुंबई आणि चेन्नईला येणारी भरती एकाच पातळीची असू शकते का, असा प्रश्न कुणाला पडत असेल तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. प्रत्येक किनाऱ्याचे अक्षांश, रेखांश आणि भौगोलिक स्थिती यामुळेही भरतीच्या पातळीवर परिणाम होतो. मग ही पातळी मोजते कोण आणि कशी? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डेहराडून येथील ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ या संस्थेकडून भारतातील ३० आणि परदेशी १४ बंदरांवरील भरती, ओहोटीचे अंदाज एक वर्ष आधी प्रसिद्ध केले जातात (हीच संस्था भारताचे अधिकृत नकाशे तयार करते.). प्रत्येक बंदरावरील आधीच्या नोंदी व खगोलीय माहिती यांचा आधार घेत हे अंदाज मांडले जातात.

अर्थात हे केवळ अंदाज नसतात, तर दर दोन मिनिटाला समुद्राची पातळी मोजण्यासाठीची यंत्रणा असते. मुंबईच्या किनाऱ्यावरही समुद्राची पातळी मोजण्यासाठी ‘ऑटोमेटिक टाइड गेज’ लावण्यात आले आहेत. या यंत्रणेची जबाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे. टाइड गेज लावण्याआधी समुद्राची सरासरी पातळी (चार्ट डेटम) निश्चित केली जाते (अनेक वर्षांच्या नोंदी, अभ्यास यानंतर प्रत्येक ठिकाणची समुद्राची पातळी ठरवलेली असते. ओहोटीच्या वेळीही पाणी या पातळीवर राहते.). इलेक्ट्रॉनिक सेन्सरद्वारे दर दोन मिनिटांनी समुद्राच्या पाण्याची पातळी नोंदवून ती केंद्राकडे पाठवली जाते. या माहितीचे विश्लेषण समुद्र तसेच पर्यावरणाच्या संशोधनासाठीही उपयोगी पडते.

बंदरावरील जहाजांच्या वाहतुकीसाठी ही माहिती उपयोगी पडते. मोठे जहाज बंदरात आणण्यासाठी पाण्याची विशिष्ट उंची आवश्यक असते. पाणी त्या पातळीला कधी पोहोचणार हे आधीच माहिती असल्याने त्याप्रमाणे जहाजांचा प्रवास सुकर होतो. मुंबईत पावसाळ्यात सखल भागातील पाणी समुद्रात सोडण्यासाठी उदंचन केंद्रातील यंत्रे सुरू करायची किंवा नाही यासाठीही भरतीच्या पातळी उपयोगाच्या ठरतात. मुसळधार पाऊस आणि त्याच वेळी भरतीची वेळ असेल तर समुद्राला मिळणारे नाल्याचे तोंड बंद केले जाते आणि त्या ठिकाणी असलेले पाणी वर उचलून मग समुद्रात टाकले जाते. भरती येण्याआधी नाल्याचे तोंड बंद केले गेले नाही तर मग समुद्राचेच पाणी शहरात घुसते. भरती-ओहोटी आणि समुद्राची पातळीच्या नोंदी आता वेगळ्या कारणांसाठीही उपयोगी पडत आहेत. ते कारण आपल्या अगदीच परिचयाचे झालेय. ते म्हणजे जागतिक तापमानवाढ. यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याची व्यक्त करण्यात आलेली भीती खरंच आहे का ते जगभरातील विविध बंदरांवरील पाण्याच्या पातळीच्या नोंदीवरून लक्षात येत आहे. भरती-ओहोटीचे संदर्भ हे असे आहेत. मात्र सारासारविचार न करता लाटांची उंची मापायला गेले की सर्व संदर्भच बदलतात.

भरती-ओहोटीची माहिती आणखीही एका संदर्भात उपयोगी पडते. भरती व ओहोटी रेषेमधील पाणथळ जमिनीत एक वेगळी परिसंस्था असते. खारफुटी, सामुद्री जीव यांच्या या परिसंस्थेचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. मात्र इंच इंच जमीन मिळवण्याच्या नादात या जमिनीवरही आक्रमण होत आहे. या पाणथळ जागेतील विश्वाविषयी नंतर कधी तरी..

मुंबई बंदरावरील भरती व ओहोटीच्या पातळ्या

  • स्प्रिंग भरतीची सर्वसाधारण पातळी  – ४.४२मीटर
  • लीप भरतीची सर्वसाधारण पातळी  – ३.३० मीटर
  • सर्वसाधारण समुद्राची पातळी  – २.५१ मीटर
  • लीप ओहोटीची सर्वसाधारण पातळी  – १.८६ मीटर
  • स्प्रिंग ओहोटीची सर्वसाधारण पातळी  – ०.७६ मीटर
  • सर्वात कमी पातळीची ओहोटी  – ०.४६ मीटर
  • सर्वात जास्त पातळीची भरती – ५.३९ मीटर

prajakta.kasale@indianexpress.com

@prajaktakasale