प्रवासी भाडेवाढ टाळून त्याची कसर माल वाहतुकीच्या दरांमधून भरून काढण्याच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या प्रयत्नाने प्रमुख वस्तूंच्या किमती नव्या आर्थिक वर्षांत वाढणार आहेत. विविध १२ वस्तूंच्या माल वाहतूक दरांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे संबंधित वस्तू महाग होण्यासह त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
कोळसा वाहतूक दरवाढीमुळे वीज, सिमेंटची वाहतूक महाग करण्यात आल्याने घरे महाग होण्याची शक्यता आहे. तर स्वयंपाकाचा गॅस व केरोसिन तसेच रासायनिक खतांसाठीची रेल्वे वाहतूक महाग करण्यात rb08आल्याने त्याचा फटका महिला व शेतकऱ्यांनाही बसणार आहे. जानेवारीअखेर महागाईचा दर स्थिरावला असतानाच पुन्हा दरभडका उडण्याची शक्यता आहे. स्थिरावलेली महागाई व केंद्रीय अर्थसंकल्पातील दिशानिर्देश पाहून नव्या आर्थिक वर्षांत व्याजदर कपातीचे संकेत यापूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिले आहेत. मात्र आता रेल्वे माल वाहतुकीच्या दरवाढीने अन्नधान्यासह अन्य जिनसांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुरुवारच्या रेल्वे अर्थसंकल्पात सर्वाधिक वाढ ही धान्य व डाळींसाठीच्या वाहतूक दरांमध्ये करण्यात आली आहे. तर सर्वात कमी माल वाहतूक दरवाढ ही एलपीजी व केरोसिनसाठी आहे. पोलाद व स्टीलच्या किमती तूर्त १,३७९ रुपये प्रति टन आहेत. तर सिमेंटच्या ५० किलोच्या एका पोत्याचे दर २५० रुपयांपुढे आहेत. त्यात पोत्यामागे १० रुपयांपर्यंत अधिक किंमत मोजावी लागणार आहे. तर स्टीलच्या किमतीही टनामागे १२ रुपयांपर्यंत वाढणार आहेत.
वाढत्या कोळशाच्या माल वाहतुकीमुळे ऊर्जा प्रकल्पांचा उत्पादन खर्च ४ ते ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका वीज ग्राहकांना युनिटमागे ५ पैसे अतिरिक्त मोजावे लागू शकतात. रासायनिक खतांसाठीची वाहतूकही १० टक्क्यांपर्यंत महाग केल्याने अनुदानावरचा भार प्रति टन ३०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

विकासाभिमुख असलेल्या यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे आगामी पाच वर्षांचा प्रवास स्पष्ट होत आहे.
रेल्वे क्षेत्रात ८.५० लाख कोटी रुपयांच्या केले जाणाऱ्या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे तसेच माल वाहतुकीच्या दरांची रचना बदल्याने वस्तूंची मागणी वाढण्यास सहकार्य होईल. स्टील मागणी गेल्या आर्थिक वर्षांत अवघ्या ०.६ टक्क्यांसह चार वर्षांतील किमान पातळीवर राहिली आहे.
– सी. एस. वर्मा, अध्यक्ष, सेल

अर्थसंकल्प ‘स्वप्नरंजन’ करणारा आहे. तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात, तर तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्याची शक्यता नाही.
मल्लिकार्जुन खरगे,  काँग्रेसचे लोकसभेतील नेते

या अर्थसंकल्पाने लोकांना स्वप्न दाखवले आहे, परंतु ते पूर्ण करण्याच्या योजनेचा त्यात अभाव आहे.
– दिनेश त्रिवेदी

हा अर्थसंकल्प पोकळ आणि निराशाजनक आहे. विकास हा साचून राहिलेल्या पाण्यासारखा नसतो.
तथागत सत्पथी, जनता दलाचे वरिष्ठ नेते

हा अर्थसंकल्प नसून २०१३ सालचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ आहे.
– एम. वीरप्पा मोईली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

ट्विटर एक्सप्रेस
जगात कोणतीही घटना घडली की त्यावर ताबडतोब ट्विट्स येण्यास सुरुवात होते. गुरुवारी पार पडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाबाबतही सकाळी आठ वाजल्यापासूनच ट्विट सुरू झाले. अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ जशी जवळ येत गेली तशी ट्विटसी संख्याही वाढत गेली. सकाळी आठ वाजता मिनिटाला आठ ट्विट होत होते. हीच संख्या दुपारी १.३० वाजता एका मिनिटाला ८६० ट्विट्सपर्यंत पोहचली. यांसदर्भातील ट्विट्स रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

थोडे रेलज्ञान
*भारतीय रेल्वे १६१ वर्षांंपूर्वी सुरू झाली. पहिली प्रवासी गाडी मुंबई ते ठाणे ३३ किमी धावली. तिला चौदा डबे होते व त्यात ४०० पाहुणे होते. ती बोरीबंदरहून दुपारी साडेतीनला सुटली, त्यादिवशी सार्वजनिक सुटी देण्यात आली होती.

*रेल्वेचे राष्ट्रीयीकरण १९५१ मध्ये करण्यात आले, त्यात आशियामध्ये भारतीय रेल्वेची यंत्रणा मोठी असून जगातील दुसरी मोठी रेल्वे यंत्रणा आहे. एकूण ११५००० किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत व एकूण १२६१७ गाडय़ा २३ दशलक्ष प्रवाशांची रोज वाहतूक करतात.म्हणजे एकूण ऑस्ट्रेलियाएवढय़ा लोकसंख्येइतके प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात.  एकण ७१७१ रेल्वे स्थानके आहेत.

*रोज ७४२१ मालगाडय़ा ३० लाख टन माल वाहून नेतात. चीन, रशिया व अमेरिका वार्षिक १० अब्ज टन मालाची वाहतूक करतात त्यांच्या रांगेत आपणही आहोत. एकूण २३९२८१ मालडबे असून ५९७१३ प्रवासी डबे व ९५४९ इंजिने आहेत.

*१९२०-२१ मध्ये अ‍ॅकवर्थ समितीने प्रथम रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची कल्पना मांडली. विल्यम अकवर्थ हे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ होते. केंद्रीय अर्थसंकल्पापासून रेल्वे अर्थसंकल्प १९२४ मध्ये वेगळा काढण्यात आला.

*स्वातंत्र्योत्तर काळात रेल्वेने ७५ टक्के सार्वजनिक वाहतूक, ९० टक्के मालवाहतूक इतके प्रमाण गाठले आहे. त्यामुळे स्वतंत्र अर्थसंकल्प आवश्यक झाला.

*२४ मार्च १९९४ रोजी लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्पाचे प्रथम थेट प्रक्षेपण करण्यात आले. ते २००४ ते २००९ पर्यंत रेल्वेमंत्री होते. त्यांनी लागोपाठ सहा रेल्वे अर्थसंकल्प सादर केले होते.

*रेल्वे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी आहेत व त्यांनी २००० व २००२ मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता. एनडीए व यूपीए या दोन्ही सरकारांचे अर्थसंकल्प त्यांनी सादर केले होते.

*भारताची सर्वात वेगवान गाडी ताशी १६० किमी वेगाची आहे.
दिल्ली-आग्रा प्रवास आता निम्न वेगवान गाडय़ांमुळे १ तासाचा होईल, आता तो ९० मिनिटांचा आहे.

*नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी ही सर्वात वेगाने जाणारी गाडी असून  तिचा वेग फरिदाबाद-आग्रा भागात ताशी दीडशे किलोमीटर आहे. मेतुपालयम-उटी निलगिरी गाडी ताशी दहा कि.मी. वेगाने धावते व ती सर्वात कमी वेगाने जाणारी गाडी आहे.

*नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला जगातील सर्वात मोठे ‘रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम’ साठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये मान मिळाला आहे. अगदी जास्त वाहतुकीच्या काळातही गाडय़ा वळवणे त्यामुळे शक्य होते.

*रेल्वेमध्ये १.४ दशलक्ष कामगार असून जगातील सातवा मोठा नियोक्ता म्हणून रेल्वेकडे बघितले जाते.

*उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात आले असून तो सर्वात लांब म्हणजे १३६६ मीटरचा आहे. पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे १०७२ मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. शिकागोत सेंटर सबले स्टेशन १०६७ मीटरचे आहे.

*रेल्वेने आतापर्यंत जगात सर्वाधिक रेल्वे पूल बांधले असून त्यांची एकूण उंची कुतुब मिनारपेक्षा पाच पट जास्त व आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटर जास्त भरेल.

*भारतीय रेल्वेत काश्मीर खोऱ्यात जम्मूतील बनिहाल नजीक पीर पांजाल बोगदा सर्वात मोठा असून तो ११.२ कि.मी लांबीचा आहे. जास्त मोठा मार्ग असलेली रेल्वे ‘विवेक एक्सप्रेस’ असून ती दिब्रुगड – कन्याकुमारी दरम्यान धावते व ४२८६ कि.मी. अंतर ८२ तास व ३० मिनिटात तोडते.

*भारतीय रेल्वेत प्रसाधनगृहे १९०९ मध्ये आली. १९८६ मध्ये रेल्वे जागांचे संगणकीकरण करण्यात आले.

*सर्वात संक्षिप्त नावाचे स्टेशन ओडिशातील ‘आयबी’ हे आहे तर सर्वात मोठय़ा नावाचे स्टेशन ‘वेंकटनरसिहराजुवरीपेटा’ हे २९ अक्षरी नावाचे आहे.

*भारतीय रेल्वेची चार ठिकाणे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहेत. त्यात दार्जिलिंग, हिमालयन रेल्वेचा १९९९ मध्ये समावेश झाला. मुंबई सीएसटी इमारत असे नामकरण २००४ मध्ये झाले. नीलगिरी रेल्वेज हे नाव २००५ मध्ये देण्यात आले. काल्का- शिमला रेल्वे हे नाव २००८ मध्ये देण्यात आले.

*नवी दिल्ली व राजस्थानमधील अल्वर दरम्यान ‘द फेअरी क्वीन’ ही गाडी धावते. ती जगातील सर्वात जुनी वाफेवर चालणारी गाडी आहे. तिची नोंद गिनीज बुकात झाली असून तिला वारसा पुरस्कारही मिळाला आहे.

*रेल्वेचे दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व, उत्तर, ईशान्य, आग्नेय, ईशान्य फ्रंटियर, दक्षिण मध्य, कोलकाता मेट्रो, पूर्व मध्य, उत्तर पश्चिम, पूर्व किनारा, उत्तर मध्य, दक्षिण-पूर्व -मध्य, दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य असे विभाग आहेत.

*रेल्वे डबे व इतर सामुग्री रायबरेली, जमालपूर, मुझफ्फरपूर येथे
तयार होते.

*मालगाडीचे प्रकार बीओएक्सएनएचएल, बीओबीवायएन, बीसीएन व बीसीएनएचएल असे आहेत.

*परदेशांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा- पाकिस्तान- थर एक्सप्रेस, समझौता एक्सप्रेस, बांगलादेश- मैत्री एक्सप्रेस
(ढाका- कोलकाता)म्यानमार- मणिपूर-म्यानमार

*रेल्वे सेवांचे प्रकार- दुरांतो एक्सप्रेस या गाडय़ा राजधानी एक्सप्रेसपेक्षा वेगवान असून त्यांना फार थांबे नसतात.

*राजधानी एक्सप्रेस- या वातानुकूलित गाडय़ा नवी दिल्लीला जोडलेल्या आहेत. वेग ताशी २०० किमी करण्याचा प्रस्ताव.