कापड व्यापारी भाविक दंड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल न करता ‘खंडणीखोरी’ केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यातील सत्य उघडकीस आणण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया दंड कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात खरा साक्षीदार असलेल्या डय़ुटी अधिकाऱ्याला चौकशीसाठी न बोलाविताच अहवाल तयार केल्याचे बोलले जात आहे.
मुलुंड पोलिसांच्या ‘खंडणीखोरी’ची बाब पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. घाटकोपर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात तेव्हा डय़ुटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला चौकशीसाठी बोलाविण्यात न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या डय़ुटी अधिकाऱ्यालाच बळीचा बकरा केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाविक यांच्या मृतदेहाशेजारी चिठ्ठी आढळल्याचे सर्वप्रथम या डय़ुटी अधिकाऱ्यानेच निदर्शनास आणले होते आणि गुन्हा दाखल करण्याची तयारीही केली होती. परंतु या डय़ुटी अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला होता, असा आरोपही दंड कुटुंबीयांनी केला आहे.
भाविक यांनी १५ ते २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावर प्रतिदिन आठ हजार रुपये असे रग्गड व्याज आकारले जात होते. व्याजापोटी अदा केलेली रक्कम मूळ रकमेपेक्षा अधिक असतानाही आरोपींकडून त्यांना धमकावले जात होते. सतत दहशतीखाली असलेल्या भाविक यांना १६ मार्च रोजी या आरोपींनी एका गोदामात नेऊन बेदम मारहाण केली. २० मार्चपर्यंत संपूर्ण रक्कम अदा न केल्यास मुलुंड परिसरात विवस्त्र करून धिंड काढू, असे धमकावले. अखेर १९ मार्च रोजी भाविक यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण झाल्याचे सांगितले होते. तसेच त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीतही त्यांनी मारहाण करणाऱ्या सर्वाची माहिती दिली होती. तरीही मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

पोलिसांचा पक्षपातीपणा
मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत भाविक यांना मारहाण करणाऱ्या सर्वाची नावे असतानाही पोलिसांनी ही चिठ्ठी सुरुवातीला लपविली, असा आरोप दंड कुटुंबीयांनी केला आहे. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ‘खंडणीखोरी’ करण्यात आली. या खंडणीखोरीचा जाहीर उल्लेख मारीया यांनी एका बैठकीत केला. त्यानंतरही गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप दंड कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित आरोपींना तुरुंगात जाऊन धमकावण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.