डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगात अव्वल समजली जाणारी फॉक्सकॉन ही तैवानस्थित कंपनी लवकरच  पुण्याजवळील तळेगाव येथून जगप्रसिद्ध आयफोन, आयपॅडचे उत्पादन करणार आहे. याशिवाय अन्य नामवंत कंपन्यांसाठी लागणारी इलेक्टॉनिक उपकरणेही ही कंपनी बनविणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि कंपनीमध्ये सामंजस्य करारावर शनिवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच चीन भेटीत या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तेव्हाच राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने दर्शविली होती. त्यानुसार हा करार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. याप्रसंगी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष टेरी गाऊ हे उपस्थित होते. ही कंपनी राज्यात येत्या पाच वर्षांत पाच अब्ज डॉलर्स गुंतवेल आणि उत्पादन प्रकल्पासह संशोधन आणि विकास केंद्रही सुरू करेल.  आयपॅड आणि आयफोनबरोबरच नामवंत कंपन्यांसाठी मोबाईल, डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही जगातील पहिल्या काही कंपन्यांमध्ये गणली जाते.  ती टीएफटी स्क्रीन आणि सेमी-कंडक्टर्सच्या उत्पादनापासून ही कंपनी राज्यातील उत्पदानास सुरुवात करणार आहे. जागतिक व्यापार केंद्र येथे पार पडलेल्या या सामंजस्य करार प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरीक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, उद्योग सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चीन दौऱ्यावर गेले असताना तेथे त्यांनी फॉक्सकॉनच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती व या कंपनीला राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले होते. राज्यातील मोठय़ा गुंतवणुकीपैकी ही एक गुंतवणूक आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

‘फॉक्सकॉन’ची ओळख..
आयपॅड आणि आयफोनबरोबरच नामवंत कंपन्यांसाठी मोबाइल, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही जगातील पहिल्या काही कंपन्यांमध्ये गणली जाते. टीएफटी स्क्रीन आणि सेमी-कंडक्टर्सच्या उत्पादनापासून फॉक्सकॉन राज्यातील उत्पादनास सुरुवात करणार आहे.

काँग्रेसचे टीकास्त्र
भाजप सरकारकडून घोषणांचा सपाटा लावण्यात आला आहे. दोन- तीन दिवसांपूर्वी याच फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी भारतात दोन बिलियन डॉलर म्हणजेच २०० कोटींची गुंतवणूक तीही पुढील १० वर्षांत करण्याचा मानस व्यक्त केला होता.  प्रत्यक्षात पाच बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचा मानस बदलला असेल तर स्वागताचेच असेल. मात्र भाजपच्या नेत्यांच्या उक्ती आणि कृतीमधला फरक पाहता महाराष्ट्राकरिता ही व इतर कंपन्यांबरोबर झालेल्या सामंजस्य कराराअन्वये अभिप्रेत गुंतवणूक ही खरी असावी अशी अपेक्षा आहे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.