मुंब्रा येथून ‘आयसिस’मध्ये गेलेल्या युवकाचा पालकांना सल्ला

‘आयसिसमध्ये दाखल व्हा. येथील जगणे एकदम सुरक्षित व आरामदायी आहे,’ असा सल्ला आपल्या कुटुंबियांना ठाण्याजवळील मुंब्रा येथून आयसिसमध्ये दाखल झालेल्या एका २८ वर्षीय युवकाने दिला आहे. तबरेझ मोहम्मद तांबे असे या युवकाचे नाव असून आपल्या मित्रांसोबत आयसिसमध्ये दाखल झाल्यावर त्याने आपल्या कुटुंबियांना हा संदेश पाठवल्याचे दहशतवाद विरोधी पथकातील एका बडय़ा अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

आयसिसमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय मुस्लिम युवकांचा टक्का वाढत असून मध्यंतरीच्या काळात मुंबई ठाणे परिसरातील मुस्लिम युवकांनीही आयसिसची वाट धरली होती. यातील कल्याण येथून आयसिसमध्ये सहभागी झालेल्या दोघांचा सिरिया येथे हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचेही उघड झाले होते. तरीही युवकांचा यातील सहभाग वाढत असल्याची बाब पुढे येत असून त्यांना येथील वास्तव्य सुखासीन वाटत असल्याची धक्कादायक बाबही पुढे आली आहे. तबरेझ या मुंब्रा येथून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या युवकाशी त्याच्या भावाने संपर्क साधून तू चुकीच्या ठिकाणी गेला असून तात्काळ घरी परत ये असे सुचवले. मात्र, मी येणार नाही उलट तुम्हीच इथे या, येथील जीवन सुरक्षित व आरामदायी असल्याचे त्याने आपल्या भावाला सांगितले. तसेच तबरेझ आपली पत्नी, भाऊ आणि आई यांच्याशी फोन, समाज माध्यमे आदींमार्फत संपर्कात असून त्यांना तो नियमित आयसिससोबत आपण काय काम करतो आहोत व कोणत्या कारवायांमध्ये सहभागी होत आहोत याची माहिती देत आहे. तबरेझने ‘कार्गो व्यवस्थापन व परिवहन’ या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली असून त्याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र तरी देखील त्यान आयसिसच्या कारवायांमध्ये स्वतला झोकून दिले. गेल्या पाच वर्षांत त्याने काही देशांमध्ये नोकरीनिमित्त प्रवास केला होता. यंदाच्या जानेवारी महिन्यात त्याने इजिप्तमध्ये नोकरी लागल्याचे कारण सांगून देश सोडला तो अद्याप परत आलेलाच नाही. इजिप्तमधून तो लिबिया येथे आयसिसमध्ये आपल्या अली नावाच्या मित्रासह दाखल झाला असून अली यानेच त्याला आयसिसमध्ये भरती होण्यासाठी बळीस पाडले. या अलीबाबत माहिती गोळा करत असून तो भारतीय आहे की नाही याची माहिती घेत आहोत. मात्र, तो यापूर्वी भारतात येऊन गेला आहे. वर्षभरापूर्वी या अलीसोबत सौदी अरेबिया येथे नोकरीस असताना त्याने एकत्र कामही केले होते. असे महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.