गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तंसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे २३०० गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली असून एस.टी. गाडय़ांबरोबरच खासगी चार चाकी गाडय़ांनाही टोलमाफी देण्याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी दिली.
गणेशोत्सव तयारीची आढावा बठक परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्या वेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, गृहविभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, त्यांना गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा या उद्देशाने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून तत्पर सेवा द्यावी अशा सूचना रावते यांनी सर्व विभागांना केल्या. गिरगाव, दादर, बोरिवली, कल्याण, परळ, पनवेल, कुर्ला नेहरूनगर अशा विविध ठिकाणांहून गणेशभक्तांसाठी एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये याची काळजी परिवहन अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच पुढील मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीचे उत्तम नियोजन करावे असे सांगताना कोकणात जाणारी वाहतूक पुणे, शिळफाटा, वडखळ नाका, रेवदंडा अशा विविध मार्गावरून वळती करावी तर परतीच्या बसेस या कराडमाग्रे मुंबईत आणाव्यात, अशा सूचनाही परिवहनमंत्र्यांनी या वेळी दिल्या. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी उत्सव काळापुरता एक वाहनतळ उभारून तिथे फिरत्या शौचालयाची व्यवस्था करावी, गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि कशेडी घाटात एक सुसज्ज रुग्णवाहिकेची व क्रेनची व्यवस्था करावी, अशा सूचनाही परिवहनमंत्र्यांनी दिल्या.