मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पुरूष बीट मार्शलबरोबरच आता महिला बीट मार्शल आल्या आहेत. मंगळवारी एका कार्यक्र मात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या २०५ महिला बीट मार्शल्सना दाखल करून घेतले. महिला पोलीस बीट मार्शल असलेले मुंबई हे देशातले पहिले शहर ठरले आहे. शहरातील गस्त आणि रस्त्यावरचे गुन्हे रोखण्यासाठी २००३ साली मुंबईत बीट मार्शल ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. पुरूष पोलीस कर्मचारी बीट मार्शल म्हणून दुचाकींवरून फिरून शहरात गस्त घालत होते. आता मुंबई पोलीस दलाने प्रशिक्षित महिला पोलिसांचा बीट मार्शल म्हणून समावेश करून घेतला आहे. मंगळवारी मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमात या महिला बीट मार्शल्सचा औपचारिक समावेश करून घेण्यात आला. गृहमंत्री पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षी पोलीस दलात साडेचार हजार महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला असून लवकरच टप्प्याटप्याने आणखी २० हजार महिला पोलिसांचा समावेश करून घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. देशातील गुन्हेगारीचा आकडे पाहता मुंबई आणि महाराष्ट्र हे देशातील सर्वात सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला. या महिला बीट मार्शल्सना सर्वप्रकारचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. दुचाकी चालवणे, शस्त्र चालवणे, वायरलेस उपकरणे हाताळणे आदी प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. मुंबईत ७४७ मोबाइल व्हॅन असून ९४४ पुरूष बीट मार्शल आहेत. मुंबईत ६७२ संवेदनशील स्थळे पोलिसांनी तयार केली असून या बीट मार्शल्स त्या ठिकाणी प्राधान्याने गस्त घालतील, असेही त्यांनी सांगितले. महिला पोलीस असल्याने महिलांना त्यांच्याशी संवाद साधणे अधिक सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिला पोलिसांच्या जीवनावर आधारित ‘मर्दानी’ चित्रपटाची अभिनेत्री राणी मुखर्जी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा आदी यावेळी उपस्थित होत्या.