घरांची विक्री होत नाही वा सदनिका पडून असल्याची ओरड मालमत्ता क्षेत्रातून होत असली, तरी मुंबईत घरांच्या खरेदी-विक्री नोंदणीचा गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास सरासरी नोंदणीत फार काही बदल झालेला नाही. उलट दरवर्षी नैसर्गिक पाच ते दहा टक्क्यांची वाढच होत असून, खरेदी-विक्रीत घट झालेली नाही.
मुंबईत स्थावर मालमत्ता क्षेत्राला वाईट दिवस आल्याची आवई उठविली जाते. विकासकांना अपेक्षित खरेदी-विक्री होत नसली, तरी कोणत्याही भागांमध्ये व्यवहार कमी झालेले नाहीत, असे आकडेवारीच सांगते. तसेच मुंबई, ठाण्यात बँकेचे गृहकर्ज घेणाऱ्यांच्या संख्येतही दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते, असा निष्कर्ष रिझव्‍‌र्ह बँकेनेच काढला आहे.  
मुंबईतील सर्व नोंदणी कार्यालयांमध्ये एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात एकूण दोन लाख, ४१ हजार, ३२५ दस्तांची नोंदणी झाली आहे. काही वेळा एका दस्तात एकापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी होते. दस्तांच्या एकूण नोंदणीत ४० टक्के नोंदणी ही भाडेतत्त्वावरील मालमत्तांची असते, असे नोंदणी विभागाच्या मुंबईचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
गेल्या आर्थिक वर्षांत मुंबई, ठाणे, पुणे या नागरी पट्टय़ात स्थावर मालमत्ता क्षेत्रात दहा टक्के वाढ झाल्याची माहिती सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. नैसर्गिक वाढीनुसार दरवर्षी आठ ते दहा टक्के सदनिकांच्या खरेदी-विक्रीत वाढ होत असली, तरी स्थावर मालमत्ता क्षेत्रात पाहिजे तशी वाढ होत नसल्याचे मत, महाराष्ट्र चेम्बर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे पदाधिकारी सुनील मंत्री यांनी व्यक्त केले. खरेदी- विक्रीची नोंदणी आणि बँकांकडून होणारे कर्जवाटप यांची आकडेवारी बघितल्यास एकूण कल सारखाच दिसतो. मुंबई, ठाणे पट्टय़ात घरांच्या किमती वाढल्याने खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. यावर उपाय म्हणून कर्जावरील व्याजाचा दर कमी झाला तरी या क्षेत्रात चांगले दिवस येतील, असे मंत्री यांचे म्हणणे आहे.